वाझेला होताशी धरून आपल्यावर नवे आरोप – अनिल देशमुख
मुंबई: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्यावर केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपल्या विरोधात नवा डाव आहे, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आपण काही दिवसापूर्वी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळेच त्यांनी वाझेला होताशी धरून आपल्यावर नवे आरोप केले आहेत, असे ते म्हणाले.
सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शपथपत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करा, असा निरोप फडणवीस यांनी आपल्याला पाठविला. मात्र, आपण तुरुंगात जायला तयार आहोत पण खोटे आरोप करणारे शपथपत्र करून देणार नाही, असे उत्तर दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आपल्या या आरोपानंतर लगेचच कारागृहात असलेल्या वाझे यांनी आपल्यावर आरोप करण्याची वेळ साधणे यावरूनच त्यांचा बोलविता धनी फडणवीस असल्याचे स्पष्ट होत आहे, असे देशमुख म्हणाले.
सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असून त्याच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केल्याची आठवणही देशमुख यांनी यावेळी करून दिली.
देशमुख यांच्यावरील सर्व आरोपांचे सबळ पुरावे सीबीआयकडे आहेत. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण त्या पुराव्यांसह लेखी माहिती सुपूर्त केली आहे, असे रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या वाझे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
