राज ठाकरे यांचा विचार बदलू शकतो आणि मनसे महायुतीत येऊ शकतो – दीपक केसरकर
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांचे व आमचे विचार सारखे आहेत. त्यामुळे अजूनही राज ठाकरे यांचा विचार बदलू शकतो आणि मनसे महायुतीत येऊ शकतो, असे मत शिवसेना शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते आणि राज्यातील जेष्ठ मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे सव्वा 200 ते 250 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी नुकतेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना जाहीर केले आहे. युती होईल की नाही, याच्या विचारात न अडकता निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश ठाकरे यांनी पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले की, आमची महायुती आहे. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे यांच्याशी कनिष्ठ संबंध आहेत. मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसेचे विचार समान आहेत. त्यामुळे यापुढील काळातही मनसेचा महायुतीत समावेश होण्याची शक्यता आहे.
लोकशाही रक्षणाची लढाई निश्चित जिंकू
आमदार अपात्रतेबाबत शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सुरू असलेली न्यायालयीन लढाई आपण निश्चितपणे जिंकू असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. आमची ही लढाई केवळ सत्तेसाठी किंवा पक्ष किरण ग्रुप करण्यासाठी नाही. आमदारकी पणाला लावून आम्ही लोकशाहीच्या रक्षणाची लढाई लढत आहोत. हे घटनाबाह्य सरकार असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात असला तरीही खुद्द न्यायालयाने हे सरकार आमदारांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले असल्यामुळे त्याला घटनाबाह्य म्हणता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आमचे विरोधक रेटून खोटे बोलत आहेत आणि अंतिम विजय आमचाच आहे हे स्पष्ट होत आहे, असा दावा केसरकर यांनी केला.
… हे फडणवीस यांच्या विरोधातील मोठे षडयंत्र
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन आणि त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले जाणारे आरोप याबद्दल बोलताना केसरकर यांनी हे फडणवीस यांच्या विरोधातील एक मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला. वास्तविक यापूर्वी देखील फडणवीस यांच्या पुढाकारानेच मराठा आरक्षण देण्यात आले आणि उच्च न्यायालयापर्यंत ते टिकविण्यातही आले. सध्याच्या काळात मराठा समाजाला देण्यात आलेले 10% आरक्षण हे देखील टिकणारे आरक्षण असून त्याबाबत मराठा समाजात समाधान आहे. तरीदेखील फडणवीस यांच्यावर आरोप करणे आणि आवाज मी मागण्या करणे हे अयोग्य आहे. इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे हीच आपल्या सरकारची भूमिका आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
