Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन बाधित नागरिकांना तात्काळ मदत करावी, आपत्तीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुरबाधित क्षेत्रातील स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. याकरीता पुरेसे मनुष्यबळ वाढवावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले उपलब्ध करून द्यावेत.

धरणातील पाण्याचा विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांना कळवावे, जेणेकरुन त्यासूचना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल. नदीपात्रावरील गावातील नागरिकांना स्थानिक यंत्रणेच्या माध्यमातून धरणातील पाणी विसर्गाबाबत सूचना द्याव्यात. शहरातील पुरबाधित भागात सीसीटिव्ही यंत्रणा कायान्वित करण्यात यावी. महावितरणच्यावतीने खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पुर्वरत करावा. पुणे शहरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती भविष्यात उद्भवणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असेही मोहोळ म्हणाले.

बैठकीस उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणीसाठा, विसर्गाबाबत वेळोवेळी अद्ययावत सूचना, पुरबाधित भागातील नुकसानीचे पंचनामे करुन बाधित नागरिकांना मदत, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई, नदीपात्रातील भराव काढणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या.

संसदेतून मोहोळ थेट पूरग्रस्तांच्या भेटीला !

पुणे शहरात गुरुवारी पहाटेपासून उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी अधिवेशन सोडून थेट पुण्याची वाट धरली. पुण्यात पोहोचल्यावर विमानतळावरुनच मोहोळ यांनी संगमवाडी येथील काचीवस्ती येथे भेट पूरग्रस्त कुटुंबियांशी संवाद साधला. तसेच पाटील इस्टेट परिसरातही नागरिकांची भेट घेत मोहोळ यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातही आढावा घेतला.

सिंहगड रोड आणि विश्रांतवाडीतही मोहोळांचा नागरिकांशी संवाद !

मोहोळ यांनी सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी आणि विठ्ठलनगर परिसरातही नागरिकांच्या भेटी घेतल्या. महापालिकेकडून सुरु असलेल्या उपाययोजना योग्यरित्या सुरु आहेत का? याचीही माहिती मोहोळ यांनी नागरिकांकडून घेतली. शिवाय पंचनामे आणि मदत कार्य वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading