Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून अधिक पाणी सोडण्याचे केले आवाहन

कोल्हापूर : जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला येथील पूर टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून अधिक पाणी सोडण्याचे आवाहन केले आहे. यावर हा धोका कमी करण्यासाठी अलमट्टी धरणाच्या विसर्गाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती कर्नाटक सरकारने दिली आहे.

कर्नाटकातील अलमट्टी हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा पडतो. अलमट्टी धरणाच्या विसर्गाचे योग्य नियोजन करावे, यासाठी आमदार सतीश पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंधारण विभागाचे अधिकारी परस्पर सामंजस्याने याबाबतीत काम करीत आहेत, अशी ग्वाही शिवकुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक झाली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी 42 फूट दोन इंच एवढी आहे. राधानगरी धरण देखील 100 टक्के भरले असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदीत 7 हजार 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading