Monday, April 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा समाजाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याखेरीज पर्याय नाही – मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी निर्णय घेत नाहीत आणि विरोधक आपली दखल घेत नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याखेरीज पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी आपण काही जणांची नावे निश्चित केली असून आपण दगडाला जरी उमेदवारी दिली तरी त्याला समाजाने निवडून द्यावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मला बदनाम करण्याचा डाव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले. आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत 12-13 वर्ष कोणतीही कारवाई झाली नाही. आता थेट अटक वॉरंट काढण्यात आले आहे. यापूर्वी कोणतीही नोटीस आपल्याला मिळालेली नाही. आपण मराठा समाजासाठी काम करत असल्यामुळे आपल्याला बदनाम करण्यासाठी हा डाव टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे शोभत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

त्यात लपविण्यासारखे काय?

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, शरद पवार आमच्या बाजूने काही बोलले असतील अशी शक्यता आपल्याला वाटत नाही. जर बोलले असतील तर त्यांनी उघडपणे सांगावे. त्यात लपवण्यासारखे काय आहे, असा सवालही त्यांनी केला.

… त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी

सरकारवर आपला विश्वास नाही असे आपण आजही म्हणणार नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांनी दोन महिन्याची मुदत मागितली. ती त्यांना दिली. ती संपली तरीही कोणताही निर्णय झाला नाही. आता आणखी मुदत वाढवून मागितली. ती ही 13 ऑगस्टपर्यंत देत आहोत. त्यानंतर समाजाची बैठक बोलावून त्यात निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यापासून डॉक्टरांपर्यंत आपले उमेदवार विधानसभेच्या रिंगणात असतील. मी जो उमेदवार देईन त्याला मतदान करण्याचे काम समाजाने करावे. तो दगड असेल तरी त्याला निवडून द्या. त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी मी घेत आहे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading