Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

वेळेवर सूत्र निश्चित करून जागावाटप जाहीर करा अजितदादांची अमित शहा यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली:  लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांच्या जागावटपाचा घोळ लांबवू नका. वेळेवर सूत्र निश्चित करून जागावाटप जाहीर करा, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धरला आहे. 

अजित पवार यांनी तातडीने दिल्ली गाठून मध्यरात्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट प्रामुख्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. अजित पवार यांच्या गटाला तर केवळ एका जागेवर विजय प्राप्त करता आला. भारतीय जनता पक्षाची अवस्था तर मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने फारच बिकट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघ युतीतील घटक पक्ष अडून राहिल्याने जागा वाटपाची प्रक्रिया दीर्घकाळ लांबली. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत अशी वेळ येऊ देऊ नये, अशी अजित पवार यांची भूमिका आहे. 

भाजपसमोर पेच 

मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 51 उमेदवार निवडून आले. त्या सर्व जागांवर अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसमोर आपला उमेदवार उभा करून त्याला निवडून आणायचे, असा अजित पवार यांचा पण आहे. त्याचप्रमाणे सध्या काँग्रेसचे आमदार असलेल्या काही जागांवर अजित पवार गटाकडून दावा केला जाणार आहे. विशेषतः मुंबईतील मुस्लिम मतदान निर्णायक असलेल्या चार ते पाच विधानसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी अजित पवार गटाची मागणी आहे. अजित पवार गटाने विधानसभेच्या 80 ते 90 जागांवर धावा केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीत चांगला स्ट्राईक रेट दाखविला आहे. त्याच्या आधारावर शिंदे गट तब्बल 100 जागांवर दावा करीत आहे. दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते 170 ते 180 जागांवर भाजपचे उमेदवार उभे करून स्वबळावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करावा, याबाबतीत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर आपण किती जागांवर निवडणूक लढवायची आणि किती जागा मित्र पक्षांना सोडायच्या याचा पेच भाजप समोर आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading