संगीताचार्य डॉ. मोहन दरेकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन
पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. राजन व पं. साजन मिश्रा आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य संगीताचार्य डॉ. मोहन दरेकर यांची ‘मल्हार रागावर’ विशेष कार्यशाळा रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळात आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील बहिरट वाडी येथील अक्षरनंदन प्रशाला सभागृह येथे ही विनामुल्य कार्यशाळा संपन्न होईल.
संगीताचार्य डॉ. मोहन दरेकर यांच्या मल्हार रागावरील या कार्यशाळेत मल्हार राग स्वरूप, प्रचलित -अप्रचलित सर्व मल्हार, पारंपरिक आणि बनारस घराण्याच्या बंदिशी यांचे सादरीकरण व मार्गदर्शन होईल. यावेळी तबलासाथ हरी पालवे आणि हर्मोनियमची संगत माधव लिमये करतील. संगीतसाधक, विद्यार्थी आणि संगीतप्रेमी या सर्वांसाठी ही कार्यशाळा सर्व वयोगटासाठी खुली आहे. या समर्पण प्रस्तुत, अनुभूती कार्यशाळेच्या या संधीचा लाभ संगीत क्षेत्रातील प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
