अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकास वाढवण्याच्या अनेक सकारात्मक बाबींचा उल्लेख – निरंजन किर्लोस्कर
आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प सरकारच्या ‘विकसित भारता’च्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशाची आर्थिक वाढ, रोजगार, शाश्वतता, आणि सर्वसमावेशक विकास वाढवण्याच्या अनेक सकारात्मक बाबींचा उल्लेख आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उत्पादन, मजबूत पायाभूत सुविधांचा विकास, कृषी, संशोधन व विकास यावर विशेष भर देत त्याचा पुनरुच्चार केलेला दिसत आहे. यामुळेच हा अर्थसंकल्प कंपन्यांना त्यांच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांमध्ये – विशेषत: नवीन कर्मचाऱ्यांमध्ये – गुंतवणूक करण्यास आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार रहण्यास, तसेच संशोधन आणि विकासात गुंतवणूक करायला प्रोत्साहित करणारा आहे.
या व्यतिरिक्त, हरित व्यवसायांना (ग्रीन बिझिनेसेस) प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यायाने दीर्घकाळात हरित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी हवामान निगडीत वित्तीय प्रस्ताव ठेवणे हे जागतिक हवामान बदलाच्या लढाईत भारतीय कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शविणारे आहे. तसेच हे जागतिक ESG उद्दिष्टांशी सुसंगत असल्याने अशा भारतीय कंपन्या परकीय गुंतवणुकीसाठी (FDI) अत्यंत आकर्षक ठरू शकतात.
एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट हे आर्थिक वाढ, शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेमध्ये संतुलन राखण्याचे दिसते, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन लाभ निश्चितच मिळू शकतील.
– निरंजन किर्लोस्कर, व्यवस्थापकीय संचालक – फ्लिटगार्ड फिल्टर्स प्रा. लि.
