विशाळगडावरील दगडफेकीला सत्ताधारी जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात आलेल्या अपयशानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी धर्मात आणि जाती ध्रुवीकरण केल्याशिवाय आणि त्यांच्या दंगली घडवून आणल्याशिवाय पर्याय नाही; हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले आहे. अन् त्यामुळेच या पक्षाकडून राज्याचे सामाजिक वातावरण प्रदूषित केले जातआहे; आसा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विशेषतः विशाळगडाचा पायथ्याशी घडलेल्या दगडफेकीला त्यांनी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय परिस्थिती बबत पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपला केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्ता धोक्यात आल्यामुळे धर्म आणि जातीच्या ध्रुवीकरणाबद्दल जबाबदार धरले.
कोल्हापूर जवळ विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत झालेल्या आंदोलनाबद्दल आणि त्या निमित्ताने गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील दगडफेक आणि हिंसक प्रकाराबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्व प्रकाराला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले.
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. लवकरच येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी पुन्हा सत्तेवर येतील याची शाश्वती देता येणार नाही. त्यामुळे धास्तावलेल्या सत्ताधाऱ्यांनी धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न चालवला असून त्यासाठी हिंसाचाराची मदत घेण्यासही त्यांना वावगे वाटत नाही. मात्र, जाती आणि धार्मिक जाळावर आपली राजकीय पोळी भाजून घेताना राज्यातील सामाजिक स्वास्थ्य ते धोक्यात आणून पाहत आहेत, याची जाणीव पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली.
