जुन्याच योजना नव्याने पुढे आणून सरकार कडून जनतेची फसवणूक – अंबादास दानवे
मुंबई : राज्य सरकार महिला किंवा युवकांच्या भल्यासाठी काहीही करत नसून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणून जनतेची फसवणूक करण्याचे उद्योग करीत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना सादर केली आहे. मात्र, या योजनेत काहीही नवीन नाही. ही योजना तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची म्हणजेच सन 1974 मध्येच राबवण्यात आलेली योजना आहे. त्याचेच नाव बदलून लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली ही योजना नव्याने राबवत असल्याचा. आव राज्य सरकार आणत आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला लाडकी बहीण आणि लाडके भाऊ आठवत आहेत. प्रत्यक्षात या योजना जुन्याच आहेt. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेले असताना हे सरकार युवकांना भुलथापा देत आहे. महिला आणि युवकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहनही दानवे यांनी केले.
यापूर्वी देखील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणाऱ्या काही योजना आणि मोठमोठ्या रोजगार मेळाव्यांचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या नावाने सरकारच्या वतीने करण्यात आले. प्रत्यक्षात या योजना आणि मेळाव्यातून बेरोजगार युवकांच्या पदरी काहीही पडलेले नाही. खुद्द सरकार ह आता शासकीय नोकऱ्यांमध्ये खाजगीकरण आणत आहे, अशी टीका ही दानवे यांनी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांवर टीका केली आहे. संपूर्ण घर चालवणाऱ्या बहिणीला दरमहा 6 हजार रुपये आणि भावाला बारावी असेल तर सहा, पदवीधर असेल तर 10 असा भेदभाव का, असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे सहा आणि दहा हजार रुपयात मुख्यमंत्र्यांचे घर चालते का, असा प्रश्नही त्यांनी केला. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आपण विरोध करत नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिशाभूल करणाऱ्या योजना राबविण्यापेक्षा खरोखरच जनतेचे हित साधले जाईल अशा योजना राबवा, अशी आपली भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
