चंद्रावर सापडली एक भव्य गुहा
नवी दिल्ली: इटलीतील संशोधकांच्या गटाने चंद्रावर एक भव्य गुहा शोधून काढली आहे. ही गुहा भविष्यकाळात अंतराळवीरांचे निवासस्थान होऊ शकते. अमेरिकेची अंतरिक्ष विज्ञान संस्था नासा ही चंद्रावर मानवासाठी दीर्घकालीन रहिवास विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. चंद्रावर अशा प्रकारच्या अनेक गुहा असण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. (A huge cave found on the moon)
ट्रेंटो विद्यापीठाचे संशोधक के लॉरेंजो ब्रूझोन आणि लिओनार्डो केरर यांनी रडारच्या मदतीने ही गुहा शोधली आहे. ही गुहा आकाराने एवढी भव्य आहे की चंद्राच्या पृष्ठभागावरून ती कोणत्याही उपकरणाची मदत न घेता दृष्टिक्षेपात येऊ शकते. चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ एल्ड्रिन यांचे अंतराळ यान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणापासून 400 किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. या गुहेची लांबी तब्बल 100 मीटर आहे. सी ऑफ ट्रॅक्वॅलिटी मध्ये वसलेली ही गुहा अंतराळवीरांचे निवासस्थान म्हणून उपयुक्त असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
कवी आणि लेखकांप्रमाणेच चंद्र हा वैज्ञानिकांसाठी ही आकर्षणाचे केंद्र बनला आहे. अमेरिकेची नासा चंद्रावर निवासस्थान बनविण्याच्या प्रयत्नात आहे. रशिया आणि चीन हे देशही चंद्रावर संशोधनासाठी आपला तळ विकसित करू पाहत आहेत. चंद्रावरील गुहा त्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. घट्ट झालेल्या लावारसाच्या खालच्या बाजूने द्रवरूप लावारसाचा प्रवाह दीर्घकाळ वाहत राहिल्याने अशा प्रकारच्या गुहा तयार होतात. अशा गृह पृथ्वीवरही आढळून येतात.
