Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीतील छोट्या मित्रपक्षांशी असे का वागता? कपिल पाटील यांचा सवाल

मुंबई: भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांना पळवतो असा आरोप सातत्याने करता आणि आता महाविकास आघाडीतील छोट्या मित्रपक्षांशी असे का वागता, असा संतप्त सवाल माजी आमदार कपिल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. शिवसेना ठाकरे गटामुळेच शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा कपिल पाटील यांचा आरोप आहे. 

सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य असणारे जयंत पाटील यांचा पराभव अतिशय वेदना देणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधी मुंबई शिक्षक मतदार संघ तुमचा, असा शब्द आपल्याला दिला आणि ऐनवेळी दगाही दिला. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार उभा करून त्यांचा पराभव घडवून आणला. महाविकास आघाडी म्हणून डाव्या आणि छोट्या पक्षांना जवळ घेता आणि ऐनवेळी असे का वागता, असा सवाल पाटील यांनी केला आहे. आम्हाला महाविकास आघाडी ठेवायचे की नाही, हे तुम्हीच ठरवा, असेही त्यांनी ठाकरे यांना सुनावले आहे. 

 लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका 

 लोकसभा निवडणुकीत सर्व छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीच्या मनापासून मदत केली. मात्र, मोठ्या पक्षाने त्याची जाण ठेवलेली नाही. नारायण नागोजी पाटील हे राज्याच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य होते. त्यांचे शताब्दी वर्ष जवळ आले असतानाच त्यांच्या नातवाला म्हणजेच जयंत पाटील यांना सभागृहाच्या बाहेर काढता, अशा शब्दात पाटील यांनी ठाकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. जयंत पाटील सहज निवडून आले असते. शिवसेना ठाकरे गटाने त्यांचा पराभव केला आहे, असा स्पष्ट आरोपही पाटील यांनी केला. लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी ठाकरे यांना दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading