Parbhani : राजेश विटेकर यांचा विधान परिषदेवर दणदणीत विजय
परभणी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांच्या त्यागाची यथोचित नोंद राष्ट्रवादीने घेतली असून विधान परिषद निवडणुकीत विटेकर यांनी जोरदार विजय संपादन केला आहे. गेल्या काही वर्षांपासून विटेकर यांना राजकीय यश हुलकावणी देत होते मात्र आजच्या निवडीने त्यांच्या राजकीय वाटचालीची घोडदौड जिल्ह्याच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभेची सर्व तयारी करूनही ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षासाठी दोन पावले मागे आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्ह्यात राजेश विटेकर यांच्या रूपाने राजकीय गुंतवणूक केली. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता विटेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारीची संधी दिली आणि त्यांचा विधान परिषद निवडणुकीत जोरदार विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या विटेकरांना महादेव जानकर यांच्यासाठी माघार घ्यावी लागली होती. त्याचवेळी विटेकर यांच्यावर अन्याय होणार नाही, पक्ष त्यांची यथोचित नोंद घेईल असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून खासदार संजय जाधव यांच्या विरोधात राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे सुरुवातीला निश्चित झाले होते. विटेकर कामालाही लागले होते मात्र ऐनवेळी रासपच्या महादेव जानकर यांची ‘एन्ट्री’ झाली. 2019 च्या निवडणुकीत विटेकर यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी चांगली लढत दिली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी पुन्हा लोकसभा लढवण्याचा त्यांचा मनोदय होता. लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीने परभणीत युवक व विद्यार्थी मेळावे घेऊन कोणत्याही परिस्थितीत परभणीची जागा लढवायची असा चंग बांधला होता. जानकर यांच्यासाठी विटेकर यांना माघार घ्यावी लागली मात्र विटेकर यांनी केलेल्या त्यागाचे चीज राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केले आणि त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली. विटेकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
