जोशी स्पोटर्स, क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत
पुणे : क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमी आणि २४ स्पोटर्स तर्फे आयोजित ‘कोद्रे फार्म्स मान्सुन करंडक’ खुला गट आंतरक्लब २५-२५ षटकांच्या स्पर्धेत जोशी स्पोटर्स आणि क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत ओंकार मोगलगिद्दीकर याने केलेल्या अचूक गोलंदाजी आणि फलंदाजांच्या योगदानामुळे जोशी स्पोटर्स संघाने एलिट ईगल्स् संघाचा २ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एलिट ईगल्स् संघाने २५ षटकात २१६ धावांचे आव्हान उभे केले. सम्यक शहा (४१ धावा), आयुश शर्मा (३८ धावा) आणि अमोल करमपुरी (३७ धावा) यांनी संघाचा डावाला आकार दिला. जोशी स्पोटर्स संघाच्या ओंकार मोगलगिद्दीकर याने ३४ धावात ४ गडी बाद केले. जोशी स्पोटर्सने हे लक्ष्य २४.२ षटकात व ८ गडी गमावून पूर्ण केले. शराफत शहा (नाबाद ४४ धावा), कुणाल चौहान (३४ धावा), हेमंत राठोड (३२ धावा) आणि विजेंद्र सिंग (३१ धावा) यांनी धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
यश देशमुख याने केलेल्या ९२ धावांच्या आणि उदय म्हात्रे ७३ धावांच्या जोरावर क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमीने पुणे क्रिकेट अॅकॅडमीचा ४ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे क्रिकेट अॅकॅडमीने २४१ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये स्वयम यादव याने १०४ धावांची खेळी केली. तसेच सोहम सरवदे यानेही ५२ धावांची खेळी केली. हे आव्हान क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमीने २३.५ षटकामध्ये आणि ६ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये मुख्य वाटा यश देशमुख याने उचलला. त्याने ४४ चेंडूत ३ चौकार आणि १० षटकारांसह ९२ धावांची खेळी केली. कर्णधार उदय म्हात्रे याने ७३ धावांची तर, प्रतिक डोलारे याने ४४ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
एलिट ईगल्स्ः २५ षटकात ९ गडी बाद २१६ धावा (सम्यक शहा ४१, आयुश शर्मा ३८, अमोल करमपुरी ३७, ओंकार मोगलगिद्दीकर ४-३४, शुभम कोठारी २-३४) पराभूत वि. जोशी स्पोटर्सः २४.२ षटकात ८ गडी बाद २२० धावा (शराफत शहा नाबाद ४४ (१९, ३ चौकार, ४ षटकार), कुणाल चौहान ३४, हेमंत राठोड ३२, विजेंद्र सिंग ३१, अमोल करमपुरी ३-२७, आर्य कुमावत ३-३०); सामनावीरः ओंकार मोगलगिद्दीकर;
पुणे क्रिकेट अॅकॅडमीः २५ षटकात ५ गडी बाद २४१ धावा (स्वयम यादव १०४ (७३, ९ चौकार, ६ षटकार), सोहम सरवदे ५२ (२२, ५ चौकार, ४ षटकार), निनाद पवार २-३६) पराभूत वि. क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अॅकॅडमीः २३.५ षटकात ६ गडी बाद २४४ धावा (यश देशमुख ९२ (४४, ३ चौकार, १० षटकार), उदय म्हात्रे ७३ (३४, ४ चौकार, ७ षटकार), प्रतिक डोलारे ४४, अरबाज शेख २-४६); सामनावीरः यश देशमुख;
