Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

स्त्रियांनी बळी पडण्याची मानसिकता बदलावी – माजी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी

पुणे : आपण अबला, अत्याचारग्रस्त असल्याची चुकीची समजूत बदला. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला दोष देत बसू नका, तात्कालिक अपयशाचे रडगाणे गात बसू नका आणि कोणत्याही क्षणी परिस्थितीला बळी पडण्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करा. स्त्रिया सर्व अर्थांनी सक्षम, समर्थ आहेत, याची खूणगाठ बाळगा. यशाच्या अनेक वाटा तुमची वाट पाहात आहेत, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले.

पूना वुमेन्स काऊन्सिलच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘एम्पॉवरिंग वुमेन अँड चिल्ड्रेन’ या विषयावरील परिसंवादात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. पूना वुमेन्स काऊन्सिलच्या अध्यक्ष पुष्पा हेगडे, उपाध्यक्षा कात्यायनी बालसुब्रमण्यम, प्रसिद्ध बालमानसतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, काऊन्सिलच्या खजिनदार मीनी ग्रांट, व्यवस्थापकीय विश्वस्त आबेदा इनामदार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी काऊन्सिलच्या ११ माजी अध्यक्षांचा तसेच प्रसिद्ध समाजसेविका आणि मानव्य संस्थेच्या संचालक उज्ज्वला लवाटे यांचा विशेष सत्कार मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते करण्यात आला.

शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मीनाक्षी लेखी यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनेक उदाहरणे देत स्त्रियांच्या सक्षमीकरणाविषयी विवेचन केले. “स्त्रियांनी नेहमी स्वतःवर, आपल्या सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकटीने प्रयत्न करण्यापेक्षा नेहमी टीमवर्क करण्यावर भर दिला पाहिजे. वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा नेहमीच सामूहिक प्रयत्नांना अधिक पाठिंबा मिळतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकमेकींसाठी एकमेकींसोबत, हा मंत्र जपला पाहिजे. मी हे करू शकते, मी हे निश्चित करेन, असा विश्वास ठेवून, सर्वांना सोबत घेत केलेले काम यशस्वी तर होतेच, पण दीर्घजीवी ठरते, याचे उदाहरण पूना वुमेन्स काऊन्सिलने आपले शताब्दी वर्ष साजरे करून दाखवून दिले असल्याचे लेखी म्हणाल्या.

डॉ. हरीश शेट्टी यांनी पारदर्शिकांच्या साह्याने मुलांचे भावविश्व आणि जडणघडणीतील घटक उलगडले. मुलांविषयी कोणतेही विधान करण्याआधी पालक म्हणून आपण स्वतःचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

“लहानपणापासूनच मुलांना नकार पचवण्याची, लवचिकपणाची, दुःख-वेदना समजून घेण्याची, अन्नाचा, भावनांचा, कष्टांचा आदर करण्याची सवय लावणे, ही पालकांची जबाबदारी आहे. घरातल्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मुलांना पालकांनी सहभागी करून घेतले पाहिजे. छोट्या प्रसंगातून मुलांना नकार झेलणे, पराभव स्वीकारणे, वेदनांचा, दडपणांचा, ताणाचा सामना करणे, दुसऱ्याच्या यशाला दाद देणे, सोबत राहणे आणि सहकार्याची भावना जपणे, यांचे शिक्षण मुले बालवयात घरातच शिकू शकतात, हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी पालकत्व सक्षम आणि समृद्ध केले पाहिजे”, असे ते म्हणाले.

मानव्य संस्थेच्या कार्याची माहिती संस्थेच्या संचालक उज्ज्वला लवाटे यांनी करून दिली. काऊन्सिलच्या अध्यक्षा पुष्पा हेगडे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना काऊन्सिलच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. कात्यायनी यांनी समन्वयक म्हणून मनोगत मांडले. वैशाली लकडावाला आणि राखी शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले. काऊन्सिलच्या सचिव रतुश वाडिया यांनी आभार मानले. भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्यांनी गणेशवंदना सादर केली. राखी शेट्टी, सुचिता श्रॉफ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading