‘दीपक’ या कार्यक्रमामधून रसिकांनी अनुभविले कथकमधील तीन प्रवाह
पुणे : कथक गुरु मनीषा साठे, कथक गुरु शमा भाटे यांच्या शिष्या असलेल्या शीतल कोलवालकर आणि कथक गुरु आभा आवटी यांच्या शिष्या असलेल्या श्रुती कुलकर्णी यांच्या बहारदार सादरीकरणाने ‘दीपक’ हा एकल कथक नृत्याचा कार्यक्रम रंगला.
पुण्यातील सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या कथक नाद या संस्थेच्या वतीने नुकतेच मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कथक गुरु शमा भाटे, मंगला कोलवालकर, योगिनी मेडदकर यांच्या हस्ते नटराज पूजन करीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं विजय घाटे, कथक नृत्यांगना तेजस्विनी साठे, व्हायोलिन वादक राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नवोदित व आश्वासक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने माझ्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती यावेळी शीतल कोलवालकर यांनी दिली.
श्रुती कुलकर्णी यांनी पारंपारिक शिववंदनेने आपल्या एकल कथक सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर बसंत ताल मधील एक ठुमरी त्यांनी सादर केली. यामध्ये त्यांनी अभिनय अंगाने रसिकांसमोर वसकसज्जा नायिका उभ्या केल्या. वसंत ऋतूचे वर्णन करणारे सरगम गीत सादर करीत त्यांनी समारोप केला. श्रुती यांना समीर पुणतांबेकर (तबला), यशवंत थिटे (संवादिनी), अर्पिता वैशंपायन (स्वरसाथ), धवल जोशी (बासरी) आणि आभा औटी (पढंत) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचा समारोप कथक गुरु मनीषा साठे यांच्या एकल सादरीकरणाने झाला. यावेळी त्यांनी डॉ चैतन्य कुंटे यांची रचना असलेले काली स्तवन सादर करीत आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी आपले गुरु पंडित गोपी कृष्णा यांच्या त्रितालातील काही रचना व गत निकस पेश केल्या. अभिनय नाट्यामध्ये भजन प्रस्तुती करीत त्यांनी समारोप केला. गुरु मनीषा साठे यांना निखील फाटक (तबला), राजीव तांबे (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), जयदीप वैद्य (गायन) तर वल्लरी आपटे (पढंत) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
