Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पिपाणीमुळे गेली साताऱ्याची जागा; निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ मागणी – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस

मुंबई: सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना छत्रपती उदयन महाराज यांच्या पेक्षा 32 हजार 771 मते कमी पडली. याच मतदारसंघात पिपाणी या निवडणूक चिन्हावर संजय गाडे या अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली. मतदारांनी तुतारी समजून पिपाणीला मत दिले. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर पिपाणी आणि तुतारी यांच्या चित्रातील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पिपाणी गोठविण्याची मागणी

आगामी विधानसभा  निवडणुकीत पिपाणीचा फटका तुतारीला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आतापासूनच पावले उचलली आहेत. पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी केली आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तुतारी आणि पिपाणी यामध्ये साधर्म्य असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हा संभ्रम टाळण्यासाठी पिपाणी हे निवडणूक चिन्ह गोठवावे, अशी मागणी पक्षाने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading