पं. डॉ राम देशपांडे व पं डॉ अजय पोहनकर यांच्या गायनाने रंगली ‘संगीत संध्या’
पुणे : सवाई गंधर्व यांचे नातू आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य स्वर्गीय पं श्रीकांत देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संगीत संध्या हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. डॉ राम देशपांडे आणि ज्येष्ठ व दिग्गज गायक पं डॉ अजय पोहनकर यांच्या सुश्राव्य गायनाने रंगला.
स्व पं श्रीकांत देशपांडे मित्र मंडळाच्या वतीने नुकतेच कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे हे सलग १२ वे वर्ष असून याप्रसंगी पं श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिथयश कलाकार, साथसंगतकार आणि पुणेकर श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरयोगिनी पद्म विभूषण डॉ प्रभा अत्रे, चंद्रकांत कपिलेश्वरी, विद्याताई अभिषेकी, मंगेश मुळ्ये, मिलिंद पोटे, श्रीरंग चासकर आदी दिवंगत कलाकारांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर पं. डॉ राम देशपांडे यांचे गायन संपन्न झाले. यावेळी डॉ राम देशपांडे यांनी राग मुलतानी गायला. यामध्ये त्यांनी ‘कवन देस गये पिया मोरा…’ ही विलंबित झुमऱ्यामधील बडा ख्याल बंदिश प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी मध्यलय तीनताल मध्ये ‘आज बाजत…’ ही रचना गायली. दृत एकताल मधील ‘नैनन मै आन बान…’ ही बंदिश त्यांनी सादर केली. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ हे भजन सादर करीत त्यांनी समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अर्चना देशपांडे व गंधार देशपांडे (गायन) व मयूर कोळेकर, मंदार कट्टे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
यावेळी बोलताना पंडित डॉ राम देशपांडे म्हणाले, “मला पंडित श्रीकांत देशपांडे यांचा जो काही सहवास लाभला मला लाभला त्यादरम्यान ते श्रेष्ठ आणि एक अभ्यासू गायक असल्याचे माझ्या लक्षात आले. ते मोकळ्या स्वभावाचे होते. आम्ही वयाने लहान असूनही त्यांनी आमच्याशी मैत्री केली. आज या कार्यक्रमानिमित्त त्यांना आदरांजली वहायला मिळत असल्याचा आनंद आहे.”
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायक पं डॉ अजय पोहनकर यांचे गायन झाले. पं श्रीकांत आणि आमचा जुना ग्रुप होता अशा आठवणी पोहनकर यांनी जागविल्या. पुणेकरांनी मला कायमच प्रेम दिले आहे, पण आज मी फक्त श्रीकांतसाठी गातोय असेही पं डॉ अजय पोहनकर म्हणाले. त्यांनी यावेळी राग शुभ कल्याण सादर केला. यामध्ये त्यांनी विलंबित एकतालातील ‘प्यारा बनरा मोरा…’ हा बडा ख्याल, व द्रुत तीनतालातील ‘पिहरवा मोरी बैयां…’ ही बंदिश त्यांनी गायली. आपल्या आई सुशीलाबाई पोहनकर यांनी संगीतबद्ध केलेली ‘परत गयी अब मोरी सैयां…’ ही रचना त्यांनी प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी राग जयंत मल्हारमध्ये ‘आई रे बरखा ऋतू…’ ही द्रुत एकतालातील रचना प्रस्तुत केली. ‘बाजू बंद खुल खुल जा…’ या भैरवीने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन), केदार रोडे व मधुरा गुजर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
