Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLE

देशभरातील विहिरी, पुष्करणी, बारव यांचे दृश्यकलेच्या माध्यमातून टिपलेल्या छबींचे प्रदर्शन

 

पुणे : चित्रकला, छायाचित्रे आदींच्या मदतीने देशभरातील विहिरी, पुष्करणी, बारव यांच्या छबींची झलक रसिक प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या ‘मॅपिंग स्टेपवेल – अ व्हिज्युअल नरेटिव्ह’ या प्रदर्शनीचे आयोजन शुक्रवार दि. २१ जून ते रविवार दि. ३० जून दरम्यान कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम या ठिकाणी करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्व दिवस सकाळी ११ ते सायं ७.३० दरम्यान रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

मोनालिसा कलाग्राम आणि आयजीए गॅलेरिया यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात पुण्याच्या कलाकार रश्मी घोष यांच्या कलाकृती पाहता येणार असून नलिनी मालवीय या प्रदर्शनाच्या क्युरेटर असणार आहेत. रश्मी घोष यांचे हे एकल प्रदर्शन असून याद्वारे रश्मी आपला संशोधनात्मक कलाप्रकल्पच जणू पुणेकर रसिकांसमोर सादर करणार आहेत.

या प्रदर्शनासाठी रश्मी यांनी देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या विहिरी, बारव यांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान त्या त्या ठिकाणचे मॅपिंग त्यांनी केले आणि दृश्यकलेच्या अनेक माध्यमांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न रश्मी घोष या प्रदर्शनामध्ये करीत आहेत. द्रुक श्राव्य माध्यम देखील या ठिकाणी वापरले गेले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना रश्मी घोष म्हणाल्या, “गेली अनेक वर्ष विहिरींबद्दल मला स्वत:ला आकर्षण होतेच. जगाच्या पाठीवर, भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी किंवा त्यासमान बांधकाम सापडते हे लक्षात आले. आपल्या सांस्कृतिक वास्तू आणि वारशाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे अशी माझी धारणा असल्याने मी या विषयात काम करायला सुरुवात केली आणि हा विषय कलात्मकरित्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी करीत आहे.”

या संशोधनात्मक विषयासाठी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांत प्रवास करून मी तपशीलवार माहिती गोळा केली. या भागातील विहिरी, बारव यांच्या पायऱ्यांचे मॅपिंग, संरचनात्मक आकार, विस्तृत आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये भौमितिक नमुन्यांचा वापर, बांधकाम कालावधी आणि या ठिकाणांवर असलेला सांस्कृतिक प्रभाव यांचा अभ्यास करीत ते विविध कलाप्रकारात मांडण्याचा माझा प्रयत्न म्हणजे हे प्रदर्शन असल्याचे रश्मी घोष यांनी नमूद केले.

केवळ प्रदर्शन नव्हे तर विहिरी, पुष्करणी यांची सद्यस्थिती, स्थानिकांकडून समोर आलेला मौखिक इतिहास, परंपरा आणि लोककथांचे संकलन देखील रश्मी घोष यांनी केले आहे. यासाठी रश्मी घोष यांनी पाटणमधील ‘राणी की वाव’, मोढेरा येथील ‘सूर्य मंदिर’, जोधपूरमधील ‘तूरजी की झालरा’, आभानेरी मधील ‘चांद बाओरी’, बावधन येथील काळभैरव मंदिरातील लहान विहीर, सातारा येथील शाकंभरी माता मंदिर या भागांना देखील भेटी दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading