फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात अप्रकाशित बखर सापडली
पुणे: फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात दोघा मराठमोळ्या इतिहास अभ्यासकांना छत्रपती शिवरायांच्या विजयगाथेपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपर्यंत ऐतिहासिक तपशील असलेली अप्रकाशित बखर सापडली आहे. ही बखर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या 91 कलमी बखरींच्या आधीची असल्याचा या संशोधकांचा दावा आहे.
मूळचे कोल्हापूरचे आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले गुरुप्रसाद कानिटकर आणि पुणे येथील मनोज गाणी या दोन मराठमोळ्या इतिहास अभ्यासकांना फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथालयात जुनी कागदपत्र पहात असताना मोडी लिपीतील एक हस्तलिखित आढळून आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे वर्णन करणारी की अप्रकाशित बखर असल्याचे या अभ्यासाकांना दिसून आले.
या बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द कथन करण्यात आली आहे. त्यामध्ये अफजलखान वधाचे सविस्तर वर्णन आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवराय आणि महाराणी सईबाई यांच्यातील संवादाचाही त्यामध्ये उल्लेख आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील वर्णनही या बखरीत आले आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीवर केलेल्या आक्रमणाच्या नंतर, अर्थात सन 1740 नंतर ही मोडी लिपीतील बखर लिहिली गेली असावी, असा या संशोधकांचा कयास आहे
