Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

माणूस घडविणाऱ्या संस्कारांची समाजाला गरज- सूर्यकांत पाठक

पुणे : आई वडील आणि मुले यांच्यातील संवाद कमी झाल्यामुळे आज लहान मुलांमध्ये संस्कार दिसत नाहीत. संस्कार कमी पडले तर पब संस्कृती उदयाला येते, त्याचे परिणाम आज पुण्यामध्ये दिसून येत आहेत. जर चांगले संस्कार असतील तर केवळ ती मुलेच नव्हे तर चांगला समाज घडण्यासही मदत होते. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने माणूस घडविणाऱ्या संस्कारांची समाजाला गरज आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.

श्रुती सागर आश्रम फुलगाव संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, प्रा. संगीता मावळे, डॉ.मिलिंद भोई, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, पियुष शहा, संदीप लचके, श्री कसबा गणपती मंदिर विश्वस्त संगिता ठकार, गायिका स्मिता जोशी, शिल्पकार विवेक खटावकर, हर्षदा बांदल, आनंद सराफ, कार्यक्रमाच्या सांस्कृतिक प्रमुख वसुधा वडके, जयेश वडके, संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी यावेळी उपस्थित होते.

यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार मंगेश पोळ, विपुल खटावकर, जलजा शिरोळे यांना प्रदान आला. तर, कसबा गौरव पुरस्कार बालगिर्यारोहक पार्थ डांगे आणि बाल गौरव पुरस्कार जलतरणपटू लावण्या कर्डे हिला प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

महेश सूर्यवंशी म्हणाले, संस्कार वर्ग ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार असणारी लहान मुले ही मोठ्या वयामध्ये समाजाला दिशा देण्याचे काम करतात, त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारे संस्कार वर्गाची चळवळ निर्माण झाली पाहिजे. आज पालकांपेक्षा मुले मोबाईलच्या जवळ असतात, त्यांच्यावर मोबाईलचे संस्कार अधिक झालेले दिसून येतात, त्यामुळे अशा मुलांना आयुष्यामध्ये संकटे आली, तर ते योग्य प्रकारे हाताळू शकत नाहीत. पालक आणि मुले यांच्यातील संवाद वाढणे गरजेचे असून त्यासाठी अशा संस्कार वर्गांची समाजाला नितांत गरज आहे.

अनिल दिवाणजी म्हणाले समाजातील विविध घटक आम्हाला मदत करतात, त्यामुळेच गेल्या ३९ वर्षांपासून कसबा संस्कार केंद्रामार्फत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम आम्ही अविरतपणे करत आहोत. पालकांचेही यामध्ये मोठे योगदान आहे, पालक आमच्याकडे मुलांना पाठवतात, त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास आहे हे निश्चितच दिसून येते.

ते पुढे म्हणाले, संस्कारक्षम असणारी पिढी ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही तर समाजासाठी मोठे योगदान देते, असेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रिती नायकवडी, अपेक्षा राऊत, सारिका पाटणकर, सोनाली खांनगांवकर, दिव्या राऊत, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिशा पिगले, सिध्दांत शिंदे, कौस्तुभ आगवेकर, रुपेश कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. अनघा दिवाणजी, चैताली सरमहाले, दिव्या राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading