fbpx
Sunday, June 16, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त रंगली मंगलमय ‘धम्मपहाट’ 

 

पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि…., प्रथम नमो गौतमा…., नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा .., अमृतवाणी ही बुद्धांची .., अशा एकासरस एक बुद्ध आणि बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेली धम्मपहाट आज पुणेकरांनी अनुभवली.  यावेळी भंते नागघोष (पुणे), भंते हान (व्हिएतनाम), भंते संघदूता (अरुणाचल प्रदेश), भंते धम्मानंद (पुणे) यांची विशेष उपस्थिती होती.

तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेल्या ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, माध्यमतज्ञ अभिषेक भोसले यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असलेल्या ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादीत केलेल्या आयएएस वृषाली संतराम कांबळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील  पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात गायक दर्शन साटम यांच्या ‘प्रथम नमो गौतमा….’ गायक प्रतिक बावडेकर यांच्या ‘नमस्कार घ्यावा हे बुद्ध देवा…’ व गायिका कोमल धांडे पठारे यांच्या ‘अमृतवाणी ही बुद्धांची …’ या गाण्याच्या सादरीकरणाने  कार्यक्रमाची भक्तिमय सुरूवात झाली. त्यानंतर ‘इंडियन आयडॉल फेम’ प्रतिक सोळसे यांनी ‘बुद्धांच्या चरणा वरती ..’, आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी ‘माझ्या भीमाची पुण्याई..’ ही गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली. त्यानंतर दर्शन साटम यांनी सादर केलेल्या ‘भीम बनला सावली.., ‘सारेगाम फेम’ प्रतिक बावडेकर यांच्या ‘नांदण नांदणं..,’, ‘ कबिरा काहे जग अंधा ..’ आणि सोनाली सोनावणे यांनी सादर केलेल्या ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर ..’ या गाण्यांनी तर उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत नाचायला भाग पाडले.

मात्र धम्म पहाटचे मुख्य आकर्षण ठरले ते ज्येष्ठ गायिका सुषमा देवी यांनी सादर केलीली गाणी. त्यांनी ‘भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं ..’, ‘गौतम गौतम पुकारू..’, ‘काखेत लेकरू हातात झाडणं ..’ आदी गाणी सादर करीत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.

परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 19 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading