Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

अपर्णा डोळे यांची कविता हृदयाला भिडणारी : ॲड. प्रमोद आडकर

पुणे : चांगली कविता लिहिण्यासाठी चांगला माणूस असणेही आवश्यक आहे. अपर्णा डोळे यांची कविता सोपी, सुटसुटीत, सरळ आणि हृदयाला भिडणारी आहे. त्यांच्या कवितांमधील शब्दांची आखीव-रेखीव बांधणी रसिकांच्या मनात घर करून राहते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांनी केले.
अपर्णा डोळे यांच्या ‌‘तरंग‌’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोमवारी कोथरूडमधील स्वामीकृपा हॉल येथे ॲड. आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ॲड. आडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, अपर्णा डोळे या अतिशय शांत, सुस्वभावी व नम्र आहेत. त्यांचे कविता सादरीकरणही अतिशय प्रभावी असते. सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असताना त्यांनी केलेले निवेदन अभ्यासपूर्ण असते. अशा कवयत्रीच्या कविता उत्तरोत्तर अधिक सशक्त, परिपक्व होऊन बहरत राहोत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
भूषण कटककर म्हणाले, कविता माणसाचे आयुष्य सुंदर करते. अपर्णा डोळे यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व चढाओढ-पुरस्कार यांच्यामागे न लागता सातत्याने लिखाण करीत आहे. अशी व्यक्तीमत्त्वे कवितेला अधिकच सुंदर करतात. विनम्र व्यक्तीमत्त्व तसेच उत्तम सूत्रसंचालिका व कवयत्री म्हणून त्यांना समाजात कायम आदराचे स्थान मिळेल.
लेखनाचे बाळकडू व सभाधीटपणा ही आईकडून मिळालेली शिकवण आहे, असे सांगून अपर्णा डोळे म्हणाल्या, यापुढेही उत्तमोत्तम लिखाण करण्याचा प्रयत्न राहिल. ‌‘कधी तरी मनातले येऊ द्यायचे ओठांवर‌’, ‌‘नभांगणातील तारे सारे‌’ या दोन कवितांचे वाचन अपर्णा डोळे यांनी केले.
प्रास्ताविक माधवी कुलकर्णी यांनी केले तर आभार अतुल डोळे यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार अपर्णा डोळे यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading