लोकप्रबोधनकार असलेल्या कीर्तनकारांचे कौतुक होणे गरजेचे – डॉ. न.म. जोशी
पुणे : लोकमान्य टिळकांनी कीर्तनकारांना लोकप्रबोधनकार म्हटले आहे. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. मात्र, कीर्तनकार लोकांच्या शाळेत जातात आणि शिकवतात. पु.ल. देशपांडे यांनी कीर्तनकारांना एकपात्री कलाकार म्हटले आहे. कीर्तनकार हा गायक, कलाकार, नर्तक, प्रवचनकार, वक्ता असतो. एकपात्री कलाकारामध्ये हे सर्व गुण असतात. अशा लोकप्रबोधनाकार असलेल्या कीर्तनकारांचे कौतुक होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
श्री शनिवार वीर मारुती उत्सव मंडळातर्फे यावर्षी प्रथमच वीर मारुतीरायाचे भक्त श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ औरंगाबादचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मनोहरबुवा दीक्षित यांना उत्सव मंडपात प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाचे राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ५ हजार ५५५ रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मनोहरबुवा दीक्षित म्हणाले, मनातील भावाने भक्ती फलश्रुत होते. देवर्षी नारदांनी भक्तीचे लक्षण सांगितले आहे. परमेश्वराची पूजा हे भक्तीचे लक्षण आहे. केवळ पूजा करणे म्हणजे भक्ती नाही. तर, पूजा करताना मनात प्रेम भाव असणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्म भगवंताला समर्पण करायला हवे, हे देखील भक्तीचे लक्षण आहे. मनातील भाव हा महत्त्वाचा असून भावानेच भक्ती प्राप्त होते.
राम दहाड म्हणाले, शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा उत्सव गेली दोनशेहून अधिक वर्षे अखंड सुरू आहे. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा हनुमान जयंतीचा इथे चालणारा उत्सव हा बहुदा पुण्यातील नव्हे तर महाष्ट्रातील १८ दिवस चालणारा एकमेव उत्सव असावा. यावर्षीपासून दिला गेलेला लोक परंपरा पुरस्कार हा ज्यांनी भारतीय व मराठी परंपरा जपण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत व आपली असलेली परंपरा पुढे चालू ठेवली आहे, अशांना दरवर्षी देण्यात येणार आहे.
