पर्यावरणवादी कार्यकर्ते नायक ठरत नाहीत तोपर्यंत समाजपरिवर्तन अशक्य : सतीश खाडे
पुणे : विकास आणि काँक्रिटिकरण हे आजच्या काळात समानाथ शब्द झाले असून पर्यावरणवादी हा शब्द शिवी झाली आहे. पर्यावरण, पाणी बचत या विषयी कार्य करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत समाजासाठी नायक ठरत नाहीत तोपर्यंत पर्यावरणविषयक समाजपरिवर्तन होणार नाही, असे परखड मत पाणीविषयक कार्य करणाऱ्या रोटरियन सतीश खाडे यांनी व्यक्त केले. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या विकासकामांना समाजातील विचारवंत, बुद्धिजीवी व्यक्ती रस्त्यावर उतरून विरोध करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पाणी बचतीचा संदेश देण्याबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या सतीश खाडे यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे शुक्रवारी (दि. 10) विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात खाडे यांचा सत्कार ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आला. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्यध्यक्ष मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जीवंत ठेवण्यासाठी विषयानुरूप कविसंमेलने आयोजित केली जातात, ज्या योगे सामाजिक विषयांना वाचा फोडली जाते व समाजप्रबोधनही केले जाते.
नैसर्गिक संसाधनांचे पुढील पिढीसाठी संवर्धन करून ठेवणे ही आज काळाची गरज आहे, असे सूचित करून खाडे म्हणाले, मानवकेंद्रीत विकासाच्या मागे लागून इतर जैववैविध्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला जात आहे. या करीता सरकारला दोष न देता सामान्य व्यक्तींनी वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवड करून भूजल पातळी वाढविण्यासाठी हातभार लावणे आवश्यक आहे.
पाणीविषयक आयोजित कविसंमेलनाचा संदर्भ देऊन खाडे म्हणाले, साहित्यिक व कवींनी त्यांच्या साहित्यकृतीतून क्रांती घडवत पाणीविषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करावी. केवळ पाण्याच्या समस्येविषयी विदारक सत्य दाखवत दु:ख मांडणाऱ्या कविता न करता आपल्या काव्यातून समाजाला पाणी व पर्यावरण विषयक कार्य करण्याकरिता प्रवृत्त करावे.
भारत सासणे म्हणाले, या पुढची युद्धे ही पाण्यासाठी होतील असे म्हटले जाते, कारण पाण्याची उपलब्धी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. पाणी म्हणजे खरे जीवन आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पाण्याचा समतोल साधणे गरजेचे असून त्या योगे पाण्याचा अनुषेश भरला जावा. समाजात असलेली पाण्याविषयीची अनास्था दूर होऊन पाणी बचतीबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. लेखक व कवींनी सामाजिक संदर्भातून आपल्या साहित्यकृतींमधून व्यक्त होणेही गरजेचे आहे. पर्यावरण, पाणीविषयक काम करणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या व्यक्तींचे कार्य रंगत-संगत प्रतिष्ठनाच्या माध्यमातून समाजापुढे आणले जात आहे ज्यातून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन घडण्यास मदत होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि परिचय अपर्णा डोळे यांनी करून दिला. अतिथींचा सत्कार प्रज्ञा महाजन यांनी केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पाणी’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात वर्षा कुलकण, वासंती वैद्य, निरुपमा महाजन, स्वप्नील पोरे, श्रीनिवास शारंगपाणी, बंडा जोशी, तनुजा चव्हाण, सरोज बामणे, सीताराम नरके, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, मिलिंद शेंडे, स्वाती दाढे, माया मुळे, आलेषा महाजन यांचा सहभाग होता.
