Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सनातन धर्म हा माणसाला ‘माणूस’ असल्याचा बोध घडवितो – राधाकृष्णजी महाराज

पुणे : प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही धर्माने अथवा पंथाने इतर धर्मांना कमी लेखणे अपेक्षित नाही. गेल्या काही वर्षात सनातन धर्माविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. सनातन धर्म हा भारतीय नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असून सनातन धर्म हा माणसाला ‘माणूस’ असल्याचा बोध घडवितो, असे प्रतिपादन श्रद्ध्येय राधाकृष्णजी महाराज यांनी केले.

श्रीगौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजा मंदिर यांच्या वतीने श्री चाराभूजा मंदिर कोथरूड द्वितीय पाटमहोत्सवानिमित्त ‘श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज तिसऱ्या दिवशी श्रद्ध्येय राधाकृष्णजी महाराज यांनी ‘युवागोष्टी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक – युवतींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीगौड ब्राह्मण समाज श्री चतुश्रुंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटन या विषयावर बोलताना राधाकृष्णजी महाराज म्हणाले, कोणत्याही प्रकारचे संघटन ही देशाची ताकद असते. संघटन ही शक्ती आहे, हे आपण ऐकत आलो आहोत. संघटन ही अशी शक्ती आहे, की ज्यामुळे मोठमोठी कामे देखील सहज पूर्ण होवू शकतात. ज्याप्रमाणे एका काडीला मोडणे सहज शक्य आहे, मात्र काड्याच्या मोळीला मोडणे सहज शक्य नाही. त्याच प्रमाणे देशातील नागरिकांचे, महिलांचे, युवा पिढीचे संघटन हीच देशाची शक्ती आहे.

आजची पिढी व्यसनाधीनतेकडे जात असताना, युवकांमध्ये देखील या विषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. व्यसन हे शरीरासाठी आणि मनासाठी नुकसानदायक आहेच. पुराणांमध्ये देखील व्यसनांमुळे अनेक राजे – महाराजे यांच्या सत्ता नष्ट झाल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे उद्याचा सक्षम भारत तयार करायचा असेल तर, आजच्या युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे श्रद्ध्येय राधाकृष्णजी महाराज म्हणाले.

मतदान हा संविधानेने दिलेला अधिकार  

भारतीय संविधानाने मतदान करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला दिला आहे. त्यामुळे प्रत्येकानेच लोकशाही बळकट करण्याची आपला अधिकाराचा वापर करणे गरजेचे आहे. माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे, असा विचार करणे व्यर्थ आहे. या विचारानेच आपल्याला हवे असणारे सरकार निवडण्यात आपण कमी पडतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत सर्वानीच मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन श्रद्ध्येय राधाकृष्णजी महाराज यांनी बोलताना केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading