आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याचे ‘यशस्वी’ संस्थेचे कार्य कौतुकास्पद – श्रीरंग गोडबोले
पुणे : शिका व कमवा योजना आणि अप्रेन्टिस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे यशस्वी संस्थेचे आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत प्रसिद्ध गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले. यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेन्ट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित ‘यशोत्सव’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बऱ्याचदा पदवी, पदव्युत्तर पदवी असे सरधोपट उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ते शिक्षण रोजगारक्षम नसल्याने असे युवक युवती बेरोजगार राहतात. मी सुद्धा इंडस्ट्रीतील शिफ्टमधल्या कामाचा अनुभव घेतला आहे,त्यानंतर आपण कला क्षेत्राकडे वळलो असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.
ऑन द जॉब ट्रेनिंग पूर्ण करून कंपन्यांमधून ऑन रोल नोकरीची संधी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, औद्योगिक कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळणे ही खूप महत्वाची गोष्ट असून ‘यशस्वी’ संस्थेमुळे ग्रामीण भागातील हजारो मुला-मुलींना प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासह इंजिनिअर होण्याची संधी मिळते ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण क्षेत्रातील अनेक छोट्या गावांमधून आलेले युवक- युवती ‘यशस्वी’ संस्थेमुळे करिअरच्या दिशेने उत्तुंग भरारी घेत आहेत, अगदी काही विद्यार्थ्यांची तर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ऑन रोल नोकरीसाठी निवड होत आहे हे खूपच प्रेरणादायी आहे. अशीच प्रगती या विद्यार्थ्यांची होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करत विद्यार्थ्यानी मोठ्या रक्कमेच्या पगाराच्या दिशेने प्रगती करतानाच व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी कला,संगीत, गायन साहित्य यांचाही आपल्या जीवनात अंगीकार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी निवडणूक विभागाच्या स्वीप कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक दीपक कदम यांनी त्यांच्या मनोगतात विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत मतदान करण्याविषयी सामूहिक शपथेचे जाहीर वाचन केले. यावेळी अप्रेन्टिस योजनेत उत्तीर्ण झालेल्या व ऑन द जॉब ट्रेनिंग पूर्ण करून विविध कंपन्यांमधून व रोल नोकरीची संधी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच यशस्वी संस्थेतील विद्यार्थ्यानी गायन, तबला वादन व कविता वाचन असे कलाप्रकार सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका अमृता तेंडुलकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक संजय छत्रे यांनी केले. यावेळी ‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्यासह, संचालक मकरंद कुलकर्णी, संचालिका स्मिता धुमाळ,संस्थेच्या पे रोल विभागाचे प्रमुख जितेंद्र पोळेकर यांच्यासह संस्थेचे फिल्ड ऑफिसर, सुपरवायझर, प्रशिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत गायनाने झाला.
