बेदखल कुळांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला – सुनील तटकरे
रायगड : राज्याचा उन्हाचा पारा वाढलेला असताना लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मंतदारसंघात राजकीय वातावरणही तापत असल्याचे दिसते. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून संपूर्ण रायगड मतदारसंघ पिंजून काढत आहेत. रायगड मतदारसंघात बेदखल कुळांचा प्रश्न मोठया प्रमाणात होता. या बेदखल कुळांसाठी अनेक कुणबी नेत्यांनी लढा दिला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत हा प्रश्न सोडविल्याचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ गुहागर शहरात महायुतीची जाहीर सभा पार पडली यावेळी सुनील तटकरे बोलत होते. या जाहीर प्रचार सभेला माजी मंत्री रामदास कदम, माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, मनसे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, गुहागर माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सिकंदर जसनाईक आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींची लाट असताना माझा निसटता पराभव झाला परंतु लोकांच्या प्रवाहापासून कधी दूर गेलो नाही आणि त्याचे २०१९ मध्ये फलित मिळाले. आज आम्ही विकासासाठी मोदीजी सोबत आहोत. ३७० कलम पंतप्रधान नरेंद्र यांनी उठवले आणि जम्मू -काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये व्हॉटसअपच्या माध्यमातून विखार पसरवला जातोय. संभ्रम निर्माण करण्यासाठी हे केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, या देशात ६५ वर्षे कॉंग्रेसने सत्ता केली. मात्र या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा दिन कधी कॉंग्रेसने साजरा केला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. अल्पसंख्याक बहुल योजनेसाठी मंडणगड तालुक्याचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून मंडणगडमध्ये अनेक विकासाच्या योजना आणल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, गुहागराला सीआरझेडचा जो प्रश्न सतावत आहे त्या कायद्यात बदल झालेला आहे. तरी हा प्रश्न प्रकर्षांने सोडविण्यासाठी मला संसदेत पाठवा नक्कीच हा प्रश्न सोडवला जाईल असा शब्द तटकरे यांनी दिला.
