Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

सतीश आळेकर लिखित ‘ठकीशी संवाद’ हे नवे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर

खास आळेकरी शैलीतील ‘ठकीशी संवाद’ हे प्रायोगिक रंगभूमीवरील नवे नाटक येत्या १० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ज्येष्ठ नाटककार, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते सतीश आळेकर लिखित व अनुपम बर्वे दिग्दर्शित हे नाटक असून सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी व गिरीजा ओक यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत.

आज नाटकाच्या चमूने प्रभात रस्त्यावरील सी. सी. अँड कंपनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी स्वत: सतीश आळेकर, गिरीजा ओक, सुव्रत जोशी, दिग्दर्शक अनुपम बर्वे, निर्माते अमेय गोसावी, सहनिर्माते गंधार संगोराम आदी उपस्थित होते.

नाटकाविषयी बोलताना लेखक सतीश आळेकर म्हणाले, “२०१४ पासून बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर हे नाटक भाष्य करते. यामध्ये कोणतीही गोष्ट सांगण्यात आली नसून, हे नाटक म्हणजे प्रेक्षकांशी केलेला दीर्घ संवाद आहे. ‘ठकीशी संवाद’ हे दोन पात्री नाटक असून त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेला ७५ वर्षांचा वृद्ध इसम सद्य काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीवर आपले भाष्य मांडतो.”

कोविड – १९ महामारी ही या नाटकाचा एक महत्त्वाचा संदर्भ बिंदू असून याच दरम्यान उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. नाटकाचे मुख्य पात्र असलेला एक मराठी नाटककार मराठी रंगभूमीच्या इतिहासाविषयी ‘ठकी’ या बाहुलीशी सखोल संवाद साधतो, हाच संवाद म्हणजे हे नाटक होय, असे आळेकर यांनी सांगितले.

२०१३ साली आलेल्या ‘एक दिवस मठाकडे’ या नाटकानंतर दीर्घ काळाने सतीश आळेकर यांचे नाटक रंगभूमीवर येत आहे. शिवाय सतीश आळेकरांच्या वयाच्या ७५ व्या वर्षांत हे नाटक येत आहे हे विशेष.

आधुनिक आणि प्रायोगिक रंभभूमीवरील एक नावाजलेले ज्येष्ठ नाटककार म्हणून आपण सर्वच जण सतीश आळेकर यांना ओळखतो असे सांगत नाटकाचे दिग्दर्शक अनुपम बर्वे म्हणाले, “मी स्वत: ललित कला केंद्रात सतीश आळेकर यांचा विद्यार्थी होतो. त्यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या वेगवेगळ्य संचांचा मी भागही होतो. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान जेव्हा सतीश सरांनी हे नाटक लिहिले, याची संहिता त्यांनी वाचायला दिली, तेव्हा हे नाटक करावे, असे मला वाटले. लॉकडाऊन काळात काही कारणाने ते जमले नाही, मात्र लॉकडाऊन नंतर ‘राखाडी स्टुडीओ’ ही नाट्यसंस्था सुरु केली आणि आता ‘ठकीशी संवाद’ हे नाटक करता येईल आणि मी ते करू का, असे मी सतीश आळेकर सरांना विचारल्यावर त्यांनीही नाटक दिले” अशी आठवण बर्वे यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले की, “या नाटकाचा विषय मला स्वत:ला फार महत्त्वाचा वाटतो. आजच्या काळाचे ‘रिफ्लेक्शन’ हे नाटक प्रेक्षकांसमोर उभे करतेच शिवाय ते तुम्हाला भूतकाळातही घेऊन जाते. मराठी रंगभूमीकडे विशिष्ठ नजरेने पाहण्याची मुभा हे नाटक देते. यासोबतच कृत्रिम बुध्दिमत्ता, नवे तंत्रज्ञान, परंपरांशी असलेला दुवा तुटत जाणे, तो पुन्हा पुनरुज्जीवित होणे या बाबींवरही हे नाटक भाष्य करते. इतकेच नव्हे तर मागील १० वर्षांच्या राजकीय पटलाबद्दल ठाम मत हे नाटक मांडते. ‘ठकीशी संवाद’ हे नाटक दिग्दर्शित करणे माझ्यासाठी मोलाचा अनुभव असणार होताच, शिवाय ही संधी मिळाल्याबदल मी स्वत:ला भाग्यवान समजतो”, असेही बर्वे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गिरीजा ओक म्हणाल्या की , या नाटकाच्या निमित्ताने आमची ही टीम एकत्र आली असली तरी या सर्वांनाच मी गेली अनेक वर्षे ओळखते. या सर्वांसोबत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे मी आयुष्यभरासाठी एक समृद्ध अनुभव गाठीशी ठेवत आहे.

व्यावसायिक रंगभूमीची आव्हाने आणि प्रायोगिक रंगभूमीची आव्हाने ही वेगवेगळी असतात या नाटकाच्या निमित्ताने आम्ही कलाकार म्हणून काही गोष्टी ‘रिबूट’, ‘रिइन्व्हेंट’ करायचा प्रयत्न करत आहोत अशा भावना सुव्रत जोशी यांनी व्यक्त केल्या.

‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार दि. १० मे रोजी सायं ७ वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या श्रीराम लागू रंग–अवकाश येथे होणार आहे. यानंतर १४ मे पर्यंत नाटकाचे प्रयोग श्रीराम लागू रंग–अवकाश येथे संपन्न होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading