Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

मोहोळ खासदार झाल्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालतील काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांची‌ टीका

पुणे : देशासाठी मेडल जिंकणाऱ्या महिला कुस्ती पट्टूवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषनसिंग‌ यांचा सत्कार करणारे मुरलीधर मोहोळ जर उद्या खासदार झाले‌ तर ते महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतील, अशी घाणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांनी केली.

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, ॲड अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, मोहोळ यांना महापालिकेचे‌ स्थायी‌समिती अध्यक्षपद मिळाले, महापौर पद मिळाले, या काळात त्यांनी पुणेकरांसाठी काहीच केले नाही. त्यांच्या‌ काळातील समान पाणी पुरवठा योजनेचे काय झाले ? टक्केवारी न देणारा ठेकेदार मोहळ यांना मिळाला नाही त्यामुळे जायकाचा पैसा दोन वेळा परत गेला. महिलांच्या सॅनेटरी नॅपकीनलाही ठेकेदार मिळाला नाही. महापालिकेचा कारभार करताना पुणेकरांना सेवा सुविधा देण्यास भाजप आणि मोहोळ अपयशी ठरले आहेत. देशात दहा वर्षात काहीच न केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि अॅड. आसिम सरोदे यांना मारणाऱ्यांमध्ये मोहोळ यांच्या पुतण्याचा समावेश होता, त्यामुळे ते खासदार झाल्यावर पुणेकर कसे सुरक्षित राहतील ? असा‌ सवालही लोंढे यांनी केला. आमचे उमेदवार रविंद्र धंगेकर सर्वसामन्य जनतेशी जोडलेले आहेत, ते लोकांच्या हाकेला धावून जातात. त्यामुळे ते नक्की मोहोळ यांचा पराभव करतील.

संविधानाची तोडफोड केली जात आहे. ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद वापर करून राज्यपालांच्या मदतीने राजकीय अस्वस्थता निर्माण केली जात आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करून मणिपूर, छत्तीसगड राज्य पेटवली. महिलांवरील अत्याचारात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. आरोपींना सोडण्यासाठी पुरावे नष्ट करत आहेत. मणिपूर मध्ये पोलिसांदेखत महिलांवर अत्याचार होत होते. त्यामुळे देशामध्ये काँग्रेसची लाट असून पहिल्या टप्प्यात भापजचा पराभव दिसू लागला आहे. राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून नितीन गडकरी हे देखील पराभूत होतील. आमच्याकडे कार्यक्रम आहे, निती आणि नियत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हढ्या जास्त सभा घेतील, तेवढ्या जास्त‌ जागा महाविकास आघाडी व इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या‌ समोर मुनगंटीवार बहिण भावाबद्दल बोलले, ही त्यांची‌ संस्कृती आहे का ? आमच्या नेत्यांच्या सभांना चांगला‌ प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाळली, त्याचे उदाहरण कर्नाटक आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली का ? काहीही पाळले नाही. उलट वेदांत फॉक्सकॉन हा एक लाख रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प गुजरातला पळवला. तरीही राज्यातील एक फुल दोन हाल्फ सत्तेतील नेते गप्प बसले. फडणवीस हे फौजदारचे हवालदार झाले आहेत. अजित दादा यांच्या वाट्याला चार जागा आल्या, त्याही ते हरत आहेत. राज्यात गद्दारी विरुद्ध खुद्दारी लढत आहे. मतदान कमी का झालं याचा विचार भाजपने करावा. ही लढाई लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे, त्यामुळे जनता काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना निवडून देईल, असेही लोंढे म्हणाले.

त्या जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार :

काही समाजाची मते डिलीट करण्यात आली आहेत. उमेदवाराला यादी दिल्यानंतर नावे काढण्यात आली आहे. विदर्भात एका एका केंद्रावरील 100 मते कमी आहेत. त्यामुळे मी नागपूर व चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.

आबा बागुल, विशाल पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करणार :

राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णया विरोधात बोलणारे आणि कृती‌ करणारे कोणीही असोत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे म्हणत लोंढे यांनी सांगलीचे विशाल पाटील व पुण्याचे आबा बागुल यांच्यावर कारवाई होऊ शकेल असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading