नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार : खासदार सुनिल तटकरे
महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांची बिरवाडी येथे विराट सभा संपन्न
महाड : बिरवाडी येथे महायुतीची विराट सभा शुक्रवार रात्री १० वाजता पार पडली. सभेस मोठ्या संख्येने शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांची कामे करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही दिली. खेड्यापाड्यातील लोकांना मतांचा अधिकार दिला. अदानी- अंबानी यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत माझ्या खेड्यापाड्यातील लोकांच्या मतांना आहे ही ताकद संविधानाने दिली आहे.
अनंत गीते यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी काम केले. भारत सरकारने ज्या योजना केल्या त्या योजनांचे काम त्यांच्याकडे होते परंतु मतदारसंघातील एकाही महिलेला रोजगार दिला नाही. अदिती तटकरे हिच्या महिला बालविकास मंत्रालयाकडून ‘लेक माझी लाडकी’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर घटू शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने हा घेतलेला निर्णय क्रांतिकारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राज्यसरकारच्या योजना आमदार भरतशेठ गोगावले हे मतदारसंघात देतीलच, परंतु भारत सरकारच्या जितक्या योजना असतील त्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा शब्दही यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी दिला. दिनांक १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दिनांक ७ मे रोजी मतदान करताना घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून विजयी करा असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले.
या जाहीर सभेला खासदार सुनिल तटकरे, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा नेते विकास गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, निलिमा घोसाळकर, नितीन पावले आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
