fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिग्नेचर एडिशन पेन महत्वाचे ठरेल – डॉ. सुरेश गोसावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचर एडिशन पेनचे उद्घाटन

पुणे  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचे विशेष महत्त्व आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

येत्या १४ एप्रिलला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या सिग्नेचर एडिशनचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे, अँड. मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी यांच्या हस्ते शुक्रवारी येथे संपन्न झाले. याप्रसंगी आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भांडारकर रस्त्यावरील पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले.

डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, ‘पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने लिहिण्याची बाब आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या या पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल’.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडीशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर केला आहे. दोन टोन मेटल बाॅडी असून, डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीने कोरली आहे. हे पेन ४५० रुपयांत तर डायरी २८० रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. डायरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे. हा विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेट मध्ये देखील उपलब्ध असेल. हे सर्व साहित्य फर्गसन रस्त्यावरील व्हीनस ट्रेडर्स जवळील ‘रायटिंग वंडर्स’ येथे उपलब्ध असेल. अशी माहिती सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.

परशुराम वाडेकर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा अमृत महोत्सव नजिक आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सिग्नेचर एडिशन पेनची निर्मिती महत्त्वाची आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार्या सर्वांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ यांसोबत विद्यार्थ्यांसाठी वह्या आणाव्यात. गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचे तेथे वाटप करण्यात येईल. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हा विशेष पेन येत्या १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असेल असेही वाडेकर यांनी सांगितले.

डॉ. विजय खरे यांनी ‘नव्या पिढीसमोर बाबासाहेबांचे सर्व साहित्य तर उपलब्ध आहेच, आता सिग्नेचर एडिशनच्या रूपाने त्यांच्या लेखणीचा आदर्शही उपलब्ध असल्याचे सांगितले. मंदार जोशी यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या वैचारिक वारशाचे जतन आणि प्रसार होण्यासाठी या सिग्नेचर एडिशन पेनचे साह्य होईल, अशी आशा व्यक्त केली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading