fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

चित्रपटासारखी दृश्य कला ही वैद्यकीय संवादाचे परिणामकारक व भविष्यवेधी माध्यम

औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन

एचआयव्ही या आजाराबद्दल जागृती करणाऱ्या ‘यु=मी’ हा लघुपटाचे प्रदर्शन

पुणे  : कोणत्याही वैद्यकीय माहितीची पत्रके ही माहिती पोहोचविणारी पारंपारिक माध्यमे म्हणून निश्चितच काम करू शकतात मात्र चित्रपट, लघुपट यांसारखे दृश्य कला प्रकार ही वैद्यकीय संवादाची परिणामकारक माध्यमे आहेत हे आता लक्षात घ्यायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. नजीकच्या भविष्यात चित्रपट, लघुपट ही माध्यम वैद्यकीय संवादामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एचआयव्ही या आजाराबद्दल जागृती करण्यासोबतच सार्वजनिक आरोग्याविषयीचा दृष्टीकोन बदलण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेला, आरभाट फिल्म्स प्रस्तुत ‘यु=मी’ या लघुपटाचे प्रदर्शन विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ मोहन आगाशे आणि डॉ रमण गंगाखेडकर यांच्या वतीने हा लघुपट सादर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर, ज्येष्ठ कलाकार आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉ मोहन आगाशे, भारतीय सार्वजनिक आरोग्य व महामारी तज्ज्ञ डॉ रमण गंगाखेडकर, लघुपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी, निर्माते डॉ संजय पुजारी, लेखक डॉ विवेक बेळे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार श्वेता बसू प्रसाद, अर्जुन राधाकृष्णन, नॅशनल कोएलिशन ऑफ पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही इन इंडिया या संस्थेचे सरचिटणीस मनोज परदेशी आणि इतर सर्व कलाकार यावेळी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉडेरिको ऑफ्रिन यांनी देखील व्हिडीओ माध्यमातून कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविला.

समाज म्हणून जगायचे असेल तर सायन्स अर्थात शास्त्रासोबतच बिहेवियरल सायन्स –   वर्तवणूक शास्त्र हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याकडे लक्ष वेधत डॉ माशेलकर म्हणाले, “गोष्ट सांगण्याची भावनिक पद्धत ही जास्त आकर्षक असल्याने तिचा होणारा परिणाम वेगळा असतो. चित्रपटाचे हे माध्यम येथेच उजवी ठरते.”

ते पुढे म्हणाले की, “आज देशात जनजागृती गरज आहे असे मला वाटते. मला खरेतर आपल्या देशाविषयी चिंता वाटते. आपण एकीकडे नव्या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानावर बोलतो, नवकल्पनांवर बोलतो, पहिल्या प्रयत्नांत मिळालेल्या चंद्रयानाच्या यशाबद्दल बोलतो मात्र दुसरीकडे एखाद्या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचे लग्न जमत नाहीये अशीही टिपणीही करतो. यावरून आपल्यासमोर असलेल्या समस्या या जगाचा विचार केल्यास खूप वेगळ्या आहेत असे मला वाटते.” कोणत्याही आजारामध्ये केवळ सहानुभूती नव्हे तर सहवेदना आणि करुणा ही जास्त महत्त्वाची आहे असेही डॉ माशेलकर यांनी नमूद केले.

डॉ माधुरी कानिटकर म्हणाल्या, “कोविड काळात कोविड झाला आहे हे इतरांना सांगायला लोकांना भीती वाटत होती. तो आजार नाही तर स्टीग्मा अर्थात कलंक आहे अशी नागरिकांची मानसिकता झाली होती. हीच परिस्थिती ९० च्या दशकात एड्स संदर्भात होती. आता मात्र या विषयात झालेल्या प्रगत संशोधनामुळे परिस्थिती अनेक पटीने बदलली आहे. जेव्हा कला आणि शास्त्र यांचा मिलाफ होऊन योग्य पद्धतीने संवाद प्रस्थापित होईल तेव्हा अशा विषयांना खऱ्या अर्थाने समाजात स्वीकारले जाईल. चित्रपट  हे माध्यम यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”

लघुपटाच्या माध्यमातून हा विषय हाताळायला खरेतर आधीच उशीर झाला. मात्र, तसे असले तरी अद्यापही या जागृतीचा फायदा समाजाला होईल याचा आनंद असल्याचे डॉ रमण गंगाखेडकर म्हणाले.

डॉ मोहन आगाशे आणि डॉ रमण गंगाखेडकर यांच्या वतीने हा लघुपट सादर करण्यात आला असून प्रबोधनासोबतच या विषयासंदर्भात एक आशेचा किरण घेऊन तो प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे असे डॉ आगाशे यांनी नमूद केले.

सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम असल्याचा पुनरुच्चार डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी केला. लघुपटाच्या माध्यमातून माहिती मिळाल्याने समाजाचे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते, यामुळे सकारात्मक बदल होऊन अनेकांना यातून प्रेरणा मिळेल असेही त्यांनी सांगितले. कला ही सामाजिक बदलासाठी प्रभावी माध्यम असून कलाकार हे सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे प्रश्न मांडणारा दुवा असल्याचे मत रॉडेरिको ऑफ्रिन यांनी व्यक्त केले.

सुमित्रा भावे यांचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न मी या द्वारे करीत आहे. आज त्या असत्या तर त्यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन नक्की केले असते असे सांगत उमेश कुलकर्णी म्हणाले, “आज आपल्या समाजात जातीव्यवस्था, धर्म यांबद्दल स्टीग्मा वाढलेला पाहायला मिळत आहे. समाज म्हणून यातून बाहेर पडण्याची आज आपल्याला गरज आहे.”

विज्ञानविषयक दृष्टीकोन असलेला आणि पारंपारिक धारणांना छेद देत सार्वजनिक आरोग्या संबंधात जनजागृती करणारा हा लघुपट असून यामध्ये निकिता आणि अर्जुन या जोडप्याची कथा दाखविण्यात आली आहे. अर्जुन एड्सग्रस्त झाल्यानंतर त्याच्या आजाराविषयी निकिताच्या मनात असलेला आजाराचा स्टीग्मा दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टर व समुपदेशक कशा पद्धतीने करतात. या सर्व परिस्थितीत निकीताच्या घरचे कसे या दोघांच्या पाठीशी उभे राहतात ही कथा या लघुपटात मांडण्यात आली आहे.

आजवर अनेक महोत्सवात या लघुपटाने पारितोषिके आणि विशेष सन्मान पटकाविले आहे. यामध्ये प्रामुख्याने कान्स वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये आरोग्य श्रेणीतील उल्लेखनीय विजयाचाही समावेश आहे. शिवाय अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्येही सदर लघुपट नावाजला गेला असून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर त्याचे कौतुक झाले आहे हे विशेष.

डॉ मोहन आगाशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading