महात्मा फुलेंनी पारंपरिक मूल्यव्यवस्था नाकारली डॉ. श्यामा घोणसे
पुणे:- महात्मा फुले यांनी समाजसुधारणेच्या कार्यात माणूस महत्त्वाचा मानून त्यासाठी सार्वजनिक सत्यधर्माचा आग्रह धरला. त्यांनी पारंपरिक मूल्यव्यवस्थेला आव्हान देऊन ते नाकारण्याचे धैर्य दाखवत त्यांच्यातील क्रांतीकारी तत्ववेत्त्याने भारतीय मूल्यव्यवस्था प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला यातच त्यांचे थोरपण आहे, असे उद्गार संत साहित्याच्या अभ्यासक डॉ श्यामा घोणसे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त त्या बोलत होत्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळील पुतळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्रमुख पाहुण्या डॉ. श्यामा घोणसे, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानिमित्त विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात डॉ. श्यामा घोणसे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन विद्यापीठामार्फत करण्यात आले होते. विकसित भारत २०४७ अंतर्गत नव्याने शिक्षणाची मुहर्तमेढ रोवण्याचे काम सुरु असून याचा पाया महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराव्या शतकात घातला असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. तसेच शिक्षण घेऊन नुसते साक्षर न होता वैचारिक साक्षर होणे गरजेचे असून वैचारिक साक्षर होणे हीच महात्मा ज्योतिबा फुले यांना खरी आदरांजली ठरेल असेही ते पुढे म्हणाले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यासनप्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आणि आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा.डॉ. अभिजित कुलकर्णी, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
