Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“महायुतीच्या तिन्ही पक्षांतील नेतृत्वाचा अर्चना पाटलांवर प्रभाव,” म्हणाल्या,  “उत्तमराव पाटील, ते पद्मसिंह पाटील अन् बाळासाहेब ठाकरे”

धाराशिव :  धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या जडणघडणीत तिन्ही पक्षांतील नेतृत्वाचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे. महायुतीत सध्या भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्ष प्रमुख सहभागी आहेत. यातच अर्चना पाटलांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्चना पाटलांनी निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. अशातच त्यांनी त्यांच्या राजकीय जडणघडणीत कोण कोणाचा प्रभाव आहे. याविषयी भाष्य केलं आहे. 

त्या म्हणाल्या की,  १९५७ मध्ये जनसंघाचे जे ४ खासदार देशभरात निवडून आले. त्यापैकी एक माझे आजोबा स्व.उत्तमराव पाटील! ते भारतीय जनसंघाचे राज्य अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य होते. माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या काळात देश सेवेसाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले. त्यांचा जनसंपर्क, त्यांचे कार्य, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बालपणापासूनच माझ्यावर प्रभाव होता.‌ मुलींनी प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घ्यावे, उच्चशिक्षित होऊन देशासाठी काम करावे अशी त्यांची शिकवणूक होती. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर विशेष प्रावीण्यासह पूर्ण झाले ते याच प्रेरणेतून.

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रभावी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आदरणीय डॉ.पद्मसिंह पाटील साहेब यांची सून म्हणून पाटील घराण्यात माझे पदार्पण झाले. डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि स्व.चंद्रकला देवी पाटील यांच्या संस्कारातून माझे सामाजिक-राजकीय जीवन समृद्ध झाले. महिलांनी सामाजिक जीवनात पुढे येण्याची आवश्यकता त्यांनी समजाऊन सांगितली. मराठवाड्यातील अनेक भाग असे आहेत, जिथे अजूनही महिलांना इच्छा असतानाही पुढाकार घेता येत नाही. त्यांना मोकळेपणाने सामाजिक जीवनात आणायचे असेल तर महिलेने पुढाकार घेऊन सातत्याने उपक्रम घेणे आवश्यक आहे. पाटील घराण्यातील महिला सामाजिक जीवनात सक्रिय दिसतात ते याच भूमिकेतून. त्यांच्या मार्गदर्शनात सुरू केलेल्या असंख्य उपक्रमांचा एकंदरीत समाजावरील झालेला सकारात्मक परिणाम जवळून पाहिला.

माहेर आणि सासर दोन्ही घराण्यातील २ सामाईक भाग म्हणजे लोकांच्या सेवेसाठी असलेला समर्पित भाव आणि महिला सक्षमीकरणाची यथार्थ जाण! या दोन्ही घराण्यातील संस्कारांनी माझ्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पाडले. यामध्ये आणखीन एका महान व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे, ते म्हणजे परम आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे.. मनात असेल ते मोकळेपणाने बोलण्याच्या माझा स्वभाव.. राजकारणात देखील मनातील रोखठोक बोलता येते हे ज्यांनी दाखवून दिले ते म्हणजे आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे.. २०१२ मध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली तेव्हापासून भाषण करताना मोकळेपणाने व्यक्त होते, त्यामागे आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव निश्चितच आहे..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading