Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल पूजन

पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदौर यांचे साधने समयी आसन असलेले ९० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प. पू. माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे या वस्तूंचे पूजन दरवर्षी मंदिरात करण्यात येते.

पूजन प्रसंगी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांसह ट्रस्टचे माजी विश्वस्त बी. एम. गायकवाड आदी उपस्थित होते. ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते यांच्यातर्फे १००० भाविकांना खिचडीचा प्रसाद देखील वाटण्यात आला. याप्रसंगी दिल्ली येथे कार्यरत आयपीएस अधिकारी केतन पाटील यांच्या हस्ते आरती झाली. आरतीसाठी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्र पिसाळ व राजू बलकवडे उपस्थित होते.

अध्यक्ष युवराज गाडवे म्हणाले, योगाभ्यानंद प. पू. माधवनाथ महाराजांची पुण्यतिथीचा हा दिवस नाथषष्ठीचा. महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्यांच्या नित्य साधनेच्यावेळी त्यांनी वापरलेले व्याघ्रासन व शाल रविवार पेठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी कै. रंगनाथ नारायण होशिंग-आलेगांवकर यांना दिले होते. हे साहित्य गेली ९० वर्षे येथील पुजारी कै. बाळकृष्ण आलेगांवकर, कै. विनायक आलेगांवकर यांनी जतन केले.

त्यांच्या पश्चात पत्नी कै. पद्मजा आलेगांवकर व मुलगी गौरी गुमास्ते, जावई राहुल गुमास्ते व नातू देवेश गुमास्ते यांनी हा अध्यात्मिक वारसा जोपासला असून दत्तमंदिरात दरवर्षी भाविकांना दर्शनासाठी नाथषष्ठीला घेऊन येतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांचे माधवनाथ महाराज हे अध्यात्मिक गुरू. त्यांच्या प्रेरणेनेच श्रीमंत दगडूशेठ यांनी पुण्यातील धार्मिक वैभव असलेले जगद् विख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमती लक्ष्मीबाई यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading