Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNESports

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

 

बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे, पुणे संघ मुलांमधून प्रथम पारितोषिक विजेता
अण्णासाहेब आवटे महाविद्यालय संघ मुलींमधून प्रथम पारितोषिक विजेता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४ पासून खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल येथे पार पडल्या. मोठ्या दिमाखाने सलग तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला. या स्पर्धेतील विजेत्या संघास प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीमती शकुंतला खटावकर आणि कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रदान करण्यात आले.

खेळाडू विद्यार्थ्यांनी जिंकण्यासाठी नक्कीच खेळावे, दुसऱ्याला हरविण्यासाठी कोणताही खेळ खेळू नये असा मोलाचा सल्ला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीमती शकुंतला खटावकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. तसेच महाराष्ट्राच्या मातीतला असलेला कबड्डी खेळ जगभर लोकप्रिय झाला असून या खेळाचा आगामी आलम्पिक स्पर्धेमध्येही समावेश होणार आहे. या खेळात पुढे विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहे. कबड्डी खेळामध्ये शिस्तीला अत्यंत महत्व असून खेळाडू विद्यार्थ्याने खेळातील शिस्त पाळावी याबाबतही त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉलमध्ये खेळासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचा प्रारंभ कबड्डी या स्पर्धेतून झाला आहे. आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी अद्ययावत खाशाबा जाधव क्रीडा संकुल हे एक प्रयोगशाळा आहे आणि ह्या खेळाच्या प्रयोगशाळेतून नक्कीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील याची मला खात्री आहे, असे कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाच्या अद्ययावत क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना खेळाडू म्हणून घडवण्याचे कार्य करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील असे प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी यावेळी सांगितले.

विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने उत्तम प्रकारे केले असल्याचे सांगत आपल्या मनोगतात कुलगुरु, प्रभारी क्रीडा संचालक, डॉ. विष्णू पेठकर आणि आयोजकांचे खेळाडू यांनी आभार मानले. तसेच अशा स्पर्धा दरवर्षी घ्याव्यात अशी भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रास्ताविक प्रा. संदीप पालवे यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ.शांताराम ढमाले व डॉ. आशा बेंगळे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेले पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या क्रीडा समितीअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेतून प्रथम चार आलेल्या उत्कृष्ट मुलांचे व मुलींचे असे एकूण १६ मुलांचे व १६ मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या पारितोषिक वितरण सोहळ्यास अमृत महोत्सव समिती सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य,अधिसभा सदस्य, विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक, क्रीडा संघटक आदी मान्यवर तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी हे उपस्थित

विजेता संघ मुले
१) बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे, पुणे ग्रामीण संघ मुलांमधून प्रथम पारितोषिक विजेता
२) लोकनेते व्यंकटराव हिरे ए. सी. एस. महाविद्यालय पंचवटी, नाशिक द्वितीय पारितोषिक विजेता
३) डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य रात्र महाविद्यालय, निगडी, पुणे तृतीय पारितोषिक विजेता

विजेता संघ मुली
१) अण्णासाहेब आवटे महाविद्यालय संघ मुलींमधून प्रथम पारितोषिक विजेता
२) श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय मुलींमधून द्वितीय पारितोषिक विजेता
३) एस. पी. महाविद्यालय मुलींमधून तृतीय पारितोषिक विजेता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading