विद्यार्थ्यांसह पालकांनी अनुभवली निसर्गशाळा
पुणे : चार भिंतींच्या बाहेर जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात शिकायला मिळते त्यावेळी मुलांनाच नव्हे तर पालकांनाही निसर्गातील अद्भुत अशा गोष्टी अनुभवायला मिळतात याची प्रचिती आज आली. निमित्त होते एमईएस सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील सायन्स क्लब अंतर्गत असलेल्या अनोख्या अशा उपक्रमाच्या समारोप समारंभाचे!
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रीन लिफ वाईल्ड लाईफ यांच्या सहकार्याने वन्यजीवांचे निरीक्षण आणि निसर्ग वाचन असा उपक्रम राबविण्यात आला. लहानपणीच मुलांना निसर्गाविषयी आवड आणि प्रेम निर्माण झाल्यास त्यांच्यात कसा बदल घडू शकतो याची माहिती या निमित्ताने पालकांना स्लाईड शोच्या माध्यमातून देण्यात आली. कोथरूडमधील बालशिक्षण मंडळी संचलित इंग्लिश मिडियम स्कूलच्या आवारातील सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवेदिका शिल्पा देशपांडे, डॉ. कपिल जोशी, मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे, विनायक पुराणिक, हिमानी जोशी, रोहन कोरगावकर, कौस्तुभ कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर कसा होतो याचे प्रात्यक्षिकच या निमित्ताने पालकांना अनुभवायला मिळाले.
डॉ. कपिल जोशी यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून पालकांना जंगलांचे प्रकार, वनस्पती, जंगलातील प्राण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना या विषयी अवगत केले.
विद्यार्थी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींबद्दल खूप उत्सुक असतात. यातूनच सायन्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आसपासचा परिसर वाचायला आणि निरीक्षण क्षमता वाढवायला शिकविले जाते. त्यांच्या का आणि कशासाठी या प्रश्नांना शास्त्रीय दृष्ट्या उत्तर देणे आवश्यक असते, असे मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले.
विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये निसर्गाचे संवर्धन करावे या करिता आतापासून प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत याची ग्वाही ग्रीन लिफ वाईल्ड लाईफचे विनायक पुराणिक यांनी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची वाढलेली उत्सुकता, त्यांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेली योग्य उत्तरे याविषयी शाळेतील पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुज हा विद्यार्थी म्हणाला, निसर्गाकडे कसे बघावे, त्यातील कुठले गुण आपण आत्मसात करावेत याविषयी जाणून घेता आले. आर्या म्हणाली, शास्त्र विषयाची आवड असल्याने मी अनेक पुस्तके वाचते. परंतु निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव या उपक्रमातून घेता आला. पालक प्रतिनिधी राहुल म्हणाले, या उपक्रमांमधून मुलांना निसर्गातील खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त योग्य वयात उत्तम संस्कार होत आहेत. तसेच सामाजिक बांधिलकीतून प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयीही मुलांमध्ये जागरुगता निर्माण करण्यात आली आली. पर्यावरणाविषयी शाळेने असे उपक्रम नियमित राबवावेत अशी अपेक्षा काही पालकांनी व्यक्त केली.
मुलांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलासंदर्भात शिक्षक प्रतिनिधी सविता म्हणाल्या, पक्षी निरीक्षण, बिनविषारी साप हाताळणे, निसर्गातील जीवनचक्र, पर्यावरणाविषयी ज्ञान या संदर्भात मुलांना या उपक्रमातून पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्याने मुलांच्या बौद्धिक विकासात भर पडल्याचे जाणवले.
मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे, शिक्षक आणि पालकांनी ग्रीन लिफ वाईल्ड लाईफचे आभार मानून हा उपक्रम ग्रीन लिफ वाईल्ड लाईफच्या माध्यमातून चालू ठेवावा, अशी आग्रही विनंती डॉ. कपिल जोशी, हिमानी जोशी आणि विनायक पुराणिक यांच्याकडे केली.
सूत्रसंचालन शुभांगी आठवले यांनी केले. तर आभार पल्लवी पळसकर यांनी मानले.
