Saturday, April 18, 2026
Latest NewsSports

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

 

पुणे: – मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्यासाठी आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्धघाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सायं. ४. ०० वाजता करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे, अमृत महोत्सव समिती सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य,अधिसभा सदस्य, विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक, क्रीडा संघटक आदी मान्यवरांच्या तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी हे उपस्थित होते.

कबड्डी खेळासाठी शारीरिक क्षमता असणे हे एकच उपकरण लागते त्यामुळे विद्यार्थ्यानी आपल्या शारिरीक बळकटीसाठी नेहमी प्रयत्न करावा, मेहनत करावी असे अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव यांनी अमृत महोत्सव समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रा. संदीप पालवे आणि प्रा. डॉ. धोंडीराम पवार, श्री.अशोक सावंत यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन समारंभ प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले. आधुनिक काळात कबड्डीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या खेळासाठी खेळताना नोकरी मिळते, पैसा मिळतो म्हणून खेळू नका तर खेळासाठी खेळा यश आपोआप मिळेल असेही ते पुढे म्हणाले.

कबड्डी स्पर्धेत समयसूचकता खूप महत्वाची आहे. बुद्धीच्या आणि ताकतीच्या बळावर अतिशय चपळतेने खेळल्या जाणाऱ्या या खेळासाठी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खेळ निवडीचे स्वातंत्र्य असल्यामुळे विविध खेळामध्ये विद्यार्थ्याचे करियर घडविण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे असे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेले पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा या क्रीडा समितीअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेतून प्रथम चार आलेल्या उत्कृष्ट मुलांचे व मुलींचे असे एकूण १६ मुलांचे व १६ मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या डॉ. शोभा शिंदे यांनी समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या अर्जुन पुरस्कार प्राप्त शांताराम जाधव यांचा विद्यार्थ्यांना अल्प परिचय करून दिला. या समारंभाचे प्रास्ताविक प्रा. संदीप पालवे यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ.शांताराम ढमाले व डॉ. विद्या पठारे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading