Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक पर्यावरणाचा तोल सावरण्यासाठी पूरक वातावरण गरजेचे : वीणा गवाणकर

पुणे : ‌‘नैसर्गिक पर्यावरणाप्रमाणेच मानवी कुबुद्धीमुळे आपले सामाजिक पर्यावरणही ढासळले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतोल सावरण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करणे, समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी झटणाऱ्या हातांना बळ पुरवणे, हे आपले कर्तव्य आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अनुवादक वीणा गवाणकर यांनी येथे केले.

स्नेहालय अहमदनगर संचलित स्नेहाधार, पुणे परिवारातर्फे आयोजित स्नेहाधार गौरव पुरस्कार सोहळा आणि संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गवाणकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी महामानव बाबा आमटे संस्था, श्रीगोंदा या संस्थेच्या माध्यमातून फासेपारधी जमातीमधील मुले साक्षर आणि सुशिक्षित व्हावीत, यासाठी कार्यरत असणाऱ्या शुभांगी अनंत झेंडे आणि ‌‘समाजबंध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ‌‘महिला आरोग्य आणि मासिक पाळी’ या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शर्वरी सुरेखा अरुण यांचा स्नेहाधार गौरव पुरस्काराने गवाणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, कृष्णा राजाराम अष्टेकर तसेच स्नेहालयच्या अध्यक्ष जया जोगदंड हे व्यासपीठावर होते. 

गवाणकर म्हणाल्या, ‌‘समाजात अनेक समस्या व प्रश्न आहेत आणि ते कमालीचे गुंतागुंतीचे आहेत. आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. परदुःख शीतल या भावनेने दुसऱ्या वाटा निवडतो. पण काही लोक परदुःख पाहून ते दूर करण्यासाठी कृतीप्रवण होतात. अशा हातांना आपण बळ पुरवले पाहिजे. आपल्या हव्यासामुळे आपण नैसर्गिक पर्यावरणाप्रमाणेच सामाजिक पर्यावरणही बिघडवले आहे. हा बिघडवलेला तोल सावरण्याची जबाबदारीही आपली आहे, त्यासाठी समस्याग्रस्तांसाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आपण पूरक बळ दिले पाहिजे. त्यांचे उन्नयन करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे हे समाजघटक म्हणून आपले कर्तव्य आहे’.

शर्वरी सुरेखा अरुण म्हणाल्या, ‌‘स्नेहालयसारख्या विविध सामाजिक समस्यांसाठी कार्यरत संस्थेने गौरव करावा, ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक मुलीसाठी मासिक पाळी ही अडचण न होता, ती त्यांची मैत्रीण झाली पाहिजे, या भावनेने आम्ही काम करत आहोत. त्यासाठी मासिक पाळीचे आरोग्यातील महत्त्व शास्त्रीय पद्धतीने समजून घेतले पाहिजे. त्यातून मानसिकता बदलेल. मासिक पाळीविषयीचे अज्ञान, भीती, संकोच, दडपण, लाज या गोष्टी मुलींच्या व्यक्तिमत्व विकासाला मारक ठरतात, असा आमचा अभ्यास सांगतो. मासिक पाळी हा वर्ज्य, निषिद्ध विषय नाही तर तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याची जाणीवजागृती आम्ही करत आहोत’.

शुभांगी अनंत झेंडे यांनी 2008 साली सुरू केलेल्या फासेपारधी मुलांसाठीच्या कार्याची माहिती दिली.
देशातील समृद्ध गोवंश दुर्लक्षित केल्यामुळे काय नुकसान होत आहे, या विषयी अष्टेकर यांनी माहिती दिली. मानवी आणि जमिनीचे असे दोन्ही आरोग्य आपण हरवले असल्याचे ते म्हणाले.
 यावेळी लेखिका मेधा देशमुख, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, बाळासाहेब कळमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिल्पा चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading