समाजाच्या, देशाच्या कल्याणामध्ये भरीव योगदान देणारे उपक्रम उद्योजकांनी हाती घ्यावेत – किर्लोस्कर
डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर अर्थात डिसीसीआयएच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डिसीसीआयएचा २२ वा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच राजा बहादूर मिल रस्त्यावरील हॉटेल शेरेटन ग्रँड या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किर्लोस्कर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. डिसीसीआयएचे अध्यक्ष रथिन सिन्हा, उपाध्यक्ष एच पी श्रीवास्तवा, सचिव व्ही एल मालू, खजिनदार प्रकाश धोका, कार्यकारी समितीचे सदस्य विभू प्रसाद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतातील सर्वात मोठे पॉलिमर कम्पाऊंड निर्माता कंपनीचे संस्थापक संचालक असलेले इंदर जैन यांना यावेळी संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने, उद्योजिका दिया गरवारे इबानेज यांना सर्वोत्कृष्ट उद्योजिका पुरस्काराने, रिअर अॅडमिरल पुरुषोत्तम शर्मा यांना उत्कृष्ट सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अॅडमिरल शर्मा यांनी सुरक्षित भारत या आपल्या उपक्रमाद्वारे आजवर अनेक नागरिकांचे प्राण वाचविले आहेत आणि तब्बल १० लाख नागरिकांना सुरक्षा विषयक प्रशिक्षण देखील दिले आहे हे विशेष. यासोबतच संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस पुरस्कार यावर्षी विका इंन्स्ट्ूमेंटस प्रा.लि यांना तर बेस्ट सेफ्टी प्रॅक्टिसेस पुरस्कार आयटीसी लि. यांना प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपली क्षमता ओळखून त्यावर विश्वास ठेवायला शिका. तांत्रिक बाबींना जवळ करीत विकास साधा आणि यशाची परंपरा अशीच पुढे चालू ठेवा असे सांगत संजय किर्लोस्कर म्हणाले, “नजीकच्या भविष्यात आपल्याला उत्पादकता, संपन्नता आणि स्थिरता यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सध्याच्या औद्योगिक क्षितीजामध्ये रोज नव्याने समोर येणारे स्टार्ट अप्स, जगाप्रमाणे बदलण्याची इच्छा आणि नवे काहीतरी शिकण्याची उर्मी हे महत्त्वपूर्ण मालमत्ता म्हणून समोर येत असताना उद्योजकांनी नवे बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी करणे गरजेचे आहे.”
आज कौशल्य विकासावर भर देण्यासोबतच प्रयोगशीलतेची कास धरत जोखीम उचलण्याची तयारी उद्योजकांनी घ्यायला हवी. बदलत्या विश्वात नवी आव्हाने स्वीकारत देशातील नवतेचा आणि विविधतेचा उत्सव साजरा करायला हवा. शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना सहयोग आणि स्पर्धा या गोष्टी महत्वाच्या असून याद्वारेच आपण आर्थिक विकासासोबत सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगती साध्य करू शकू, असेही किर्लोस्कर यांनी सांगितले.
पुणे आणि परिसरातील लघु व मध्यम उद्योजक, स्टार्ट अप्स यांसोबतच बहुराष्ट्रीय कंपन्यांना या भागात व्यवसाय करताना भेडसाविणाऱ्या समस्यांचे निराकरण करीत असताना त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे यासाठी गेले अनेक वर्षे डिसीसीआयए कार्यरत असल्याचे रथिन सिन्हा यांनी सांगितले.
पुण्याचा औद्योगिक पट्टा हा राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या भागातील उद्योजकांचे, कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आम्ही कायमच कार्यरत आहोत असे आश्वासन एच पी श्रीवास्तवा यांनी दिले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राला देशातील एक महत्त्वाचे गुंतवणूक केंद्र म्हणून नजीकच्या काळात आणखी पुढे यायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आकृष्ट करणारी धोरणे आणणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कायदा आणला असून याच्या अंमलबजावणीसाठी ‘मैत्री पोर्टल’मध्ये अपेक्षित बदल करीत याद्वारे काम सुरु करणे महत्त्वाचे आहे. या धोरणाने ठराविक वेळेत एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या आणि लायसेंन्स मिळणे आणि व्यवसाय सुलभता येणे यामध्ये निश्चितच मदत होणार आहे. हा कायदा गुंतवणूकदार आणि उद्योजक या दोहोंच्याही फायद्याचा आहे.”
देवीना राय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व्ही एल मालू यांनी आभार मानले.
