विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संकल्पना निर्माण करणे अत्यंत महत्वाचे – एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांचे प्रतिपादन
पुणे : विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना संवेदनशील बनवणे हा नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे. पाय जॅम फाऊंडेशनतर्फे आयोजित इनोव्हेशन कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून मुलांचा केवळ शिक्षणात नव्हे तर एकंदरीत समाजात सहभाग वाढविण्याचा, मुलांची उत्सुकता, निरक्षण क्षमता वाढवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संकल्पना निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण भविष्यात हेच विद्यार्थी देश घडविण्याचे काम करणार आहेत, असे मत राज्य शौक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान- भारत यांच्यातर्फे ‘इन्स्पायर मानक’ स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षीच्या ‘इन्स्पायर मानक’ स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 2149 विद्यार्थ्यांचे निवड झाली आहे. महाराष्ट्राचे हे यश वाखणण्याजोगे असून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन उपलब्ध व्हावे आणि त्यापुढील टप्पे पार करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पाय जॅम फाउंडेशन तर्फे इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी डॉ. शोभा खंदारे बोलत होत्या.
पाय जॅम फाउंडेशन यांनी बॉश ग्लोबल सोल्युशन्सच्या सहयोगाने ‘इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना डिझाईन थिंकींग, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि तंत्रज्ञानाचा प्रोटोटाइप बनविण्यासाठीचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी शाळेसाठी प्रोत्साहन म्हणून इनोवेशन कीटचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, पुणे च्या अधिव्याख्याता प्राची पाटील, बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे केंद्र प्रमुख आदित्य आडवी आणि राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानचे प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट देवेंद्र तिवारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. इनोव्हेशन कॉन्क्लेव्हसाठी पुणे, पिंपरी चिंचवड, महाबळेश्वर, अकोला, नागपूर असे महाराष्ट्रातील एकूण 150 हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे केंद्र प्रमुख आदित्य आडवी यांनी मुद्दा मांडला कि, “तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना, तंत्रज्ञान हे लोकांचे जीवनमान सुधारण्याचे अविभाज्य माध्यम आणि साधन आहे, असे आपण मानतो. समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हे विद्यार्थी शिकत असलेले महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. हे त्यांना आव्हानांना सामोरे जाण्यास आणि सोडविण्यास सक्षम करेल.”
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, पुणे च्या अधिव्याख्याता प्राची पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या अंगी विविध गुण असतात आणि त्यांच्यातील गुणांना वाव देऊन बाहेर काढणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचे आभार योगेश सोनावणे (एससीईआरटी, पुणे) तर स्वराज व मोरियम या बाल संचालकांनी सूत्रसंचलन केले.
