Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

यंदाचा स्वरश्री पुरस्कार डॉ. शीतल मोरे यांना प्रदान

 

पिंपरी  : स्वरश्री संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी शास्त्रीय गायिका श्रुती देशपांडे व पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, तर उस्ताद मोहसीन खान यांच्या सतारवादनाने रसिकांना खिळवून ठेवले. पं. सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने संगीत महोत्सवाची सांगता झाली. दरम्यान, यंदाचा स्वरश्री पुरस्कार एस. एन. डी.टी. महिला विद्यापीठाच्या संगीत विभागप्रमुख डॉ. शीतल मोरे यांना प्रसिद्ध बासरी वादक पंडित केशव गिंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
            थेरगाव येथील स्वरश्री संगीत फाउंडेशनच्या वतीने औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात दोन दिवसीय स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
            शास्त्रीय गायिका श्रुती देशपांडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना खेळवून ठेवले. त्यांनी राग मारू बिहागमध्ये ‘ये कल नाही आये’ हा बडा ख्याल सादर केला. छोटा ख्यालमध्ये ‘अखियाँ उनसे लागी’ ही बंदिश, तसेच ‘लागी कलेजवा कटार’ हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे कट्यार काळजात घुसलीमधील पद गायले. त्यांना तबल्यावर संजय देशपांडे यांनी, तर हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांनी साथसंगत केली.
           उस्ताद मोहसीन खान यांनी राग जयजयवंती सादर करीत आपल्या सतार वादनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार यांनी साथसंगत केली.
            या महोत्सवाचा समारोप पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग बिहाग बडा ख्यालमध्ये ‘कैसे सुख सोवे’, छोटा ख्यालमध्ये आली री अलबेली’ ही बंदिश, तसेच याच रागातील तराना गायला. भैरवीने आपल्या गायनाची सांगता केली. रसिकांनी टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना तबल्यावर नंदकिशोर ढोरे, हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, पकवाजावर गंभीर महाराज, टाळ मकरंद बादरायणी व शिवाजी डाके, तानपुरा व गायन साथ मुकुंद बाद्रायणी, शाश्वती चव्हाण, अभयसिंह वाकचौरे यांनी साथसंगत केली.

प्रास्ताविक आयोजक नामदेव शिंदे यांनी, तर सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading