Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

साहित्य क्षेत्राच्या इतिहासात एकतरी पान निवेदकांविषयी असावे : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : कवी, निवेदक उद्धव कानडे यांनी मैत्रीचा गोफ गुंफत सांस्कृतिक प्रगल्भतेचे नाते जोडले होते. संस्कृती प्रवाहसिद्ध करणे हे निवेदकाचे काम असते. मोजक्या शब्दात परंतु अर्थपूर्ण, निवडक आणि परिणामकारक बोलणे, कार्यक्रमाची उंची क्रमाक्रमाने वाढवत नेणे, अर्थाची घनता आणि आशयाची खोली दाखविणे ही निवेदकाची जबाबदारी आहे. हे सर्व गुण असणाऱ्या उद्धव कानडे यांच्या पठडीतील शिल्पा देशपांडे यांचे कार्य आहे. त्या बहुमुखी सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. निवेदनाच्या क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्यात त्या नेहमी तत्पर असते, असेही त्यांनी आवजूर्न नमूद केले.

प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक उद्धव कानडे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात या निस्सीम भावनेने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या उद्धव कानडे स्मृती पहिल्या पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका, कवयित्री शिल्पा देशपांडे यांचा बुधवारी गौरव करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, रजनी उद्धव कानडे व्यासपीठावर होते. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्कृतीचे संचित पेलण्याची, पचविण्याची क्षमता शिल्पा देशपांडे यांनी सिद्ध केली आहे, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, रंगत-संगत प्रतिष्ठानने कवी, निवेदक उद्धव कानडे यांच्या नावे पुरस्कार देणे हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. ॲड. प्रमोद आडकर यांनी डोळस संयोजकाच्या भूमिकेतून या पुरस्काराची कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. या पुरस्काराने साहित्याच्या संस्कृतीतील दोष दूर केला आहे. सांस्कृतिक, क्रीडा किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालकाची भूमिका ही महत्त्वाची असते. साहित्याचा इतिहास लिहिताना एकतरी पान निवेदकांविषयी लिहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उद्धव कानडे यांच्या आठवणींना उजाळा देऊन सचिन इटकर म्हणाले, प्रत्येक कार्यक्रमातील निवेदक हा दुवा जोडणारा असतो, गुणात्मक बदल घडवून आणणारा सहाय्यक असतो. कमी शब्दांमध्ये प्रभावी परिणाम साधत कार्यक्रमाचे सूत्र जोडत नेणे हे उत्तम सूत्रसंचालकाचे कर्तव्य आहे. उद्धव कानडे यांचा हा वारसा शिल्पा देशपांडे यांनी पुढे न्यावा. साहित्यिक परंपरा पुढे नेण्यासाठी उद्धव कानडे यांच्या नावे सुरू करण्यात आलेला पुरस्कार निवेदकांना प्रोत्साहन देणारा ठरेल.
सत्काराला उत्तर देतान शिल्पा देशपांडे म्हणाल्या, उद्धव कानडे यांच्या नावे मिळालेल्या पुरस्काराने निवेदनाचे संक्रमण माझी हाती आल्याची जाणीव होत आहे. सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणारे, कौतुकाची थाप देणारे हात आजच्या काळात कमी आहेत. रंगत-संगत प्रतिष्ठानने या पुरस्कारासाठी माझी निवड केली याचा आनंद आहे. त्याच वेळी जबाबदारी वाढल्याची जाणीवही आहे.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी उद्धव कानडे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा धागा उलगडून निवेदन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदितांना कानडे यांच्या कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी हा पुरस्कारामागील उद्देश असल्याचे सांगितले.
उद्धव कानडे यांच्या चिंतनशील कवितांचे अभिवाचन प्रभा सोनवणे, दयानंद घोटकर, डॉ. ज्योती रहाळकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत ॲड. प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading