Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून अखेर मोऱ्या’ २२ मार्च रोजी प्रदर्शीत होणार!

काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांना प्रत्येक गोष्ट ही संघर्ष केल्यानेच मिळते. त्यात पहिला नंबर म्हणजे सफाई कामगार. त्यांच्या दिवसाची सुरुवातच मुळात जगातील दुर्गंधी साफ करण्यासोबत होते. अश्याच एका सफाई कामगाराचे आयुष्य रेखाटणाऱ्या ‘मोऱ्या’ चित्रपटाने चित्रपटातील नायकाप्रमाणेच ‘सेंसॉर प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केला असल्याचे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व प्रमुख कलाकार जितेंद्र बर्डे यांनी पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे बोलताना जितेंद्र बर्डे म्हणाले “आपल्या महाराषट्रात आपला चित्रपट सन्मानाने प्रदर्शित झालाच पाहिजे. त्यासाठी पुन्हा चळवळीसाठी सर्वांनी एक होणे आवश्यक आहे. या लढ्यात आम्हाला महाराष्ट्रातून रसिकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील अनेक शहरांतून चित्रपट रसिक मोऱ्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणून तो तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी अश्या भाषांतूनही प्रदर्शीत होणार आहे. मोऱ्याच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांतील कामगीरीमुळे जगभरातील विविध भाषिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. आपल्या पुण्यात खऱ्याअर्थाने सांस्कृतिक सुबत्ता आहे. अनेक दर्जेदार कलाकृतींना भरभक्कम पाठिंबा या नगरीने दिला आहे. चित्रपट जागृती-निर्मितीचे हे शहर ‘मोऱ्या’लाही लोकाश्रय मिळवून देईल, याविषयी पक्की खात्री आहे”

‘मोऱ्या’ची व्यथा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना समजताच त्यांनी सेंसॉर अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन समज दिली आणि त्यांनतर जवळपास तीन वर्ष सुरु असलेला हा प्रदीर्घ संघर्षाचा लढा संपून ‘मोऱ्या’ अखेर सेन्सॉरमुक्त झाला. ही लढाई सप्टेंबर २०२२ पासून सुरु होती, ती अखेर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपुष्टात आली. यासाठी महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार हर्षल मळेकर, आणि अन्य सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी बातमीच्या माध्यमातून याची दखल घेत या विषयाकडे लक्ष वेधले. मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘माई’ या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा जेष्ठ महिला पत्रकार सौ. शीतल करदेकर यांनी तर सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करून महाराष्ट्रात कोणत्याही निर्मात्यांची अडवणूक होऊ नये म्हणून आणखी एक अधिकारी सेन्सॉर बोर्ड मुंबई कार्यालयात आपल्या प्रादेशिक चित्रपटांसाठी असावा अशी आग्रही मागणी संबंधित मंत्र्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांचे खाजगी जनसंपर्क अधिकारी विराज मुळे यांनी याकामी विशेष पाठपुरावा करून हे प्रकरण मा. मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. साहेबांनी लक्ष घालून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने अखेर ‘मोऱ्या’ सेंन्सॉरमुक्त मुक्त झाला. मात्र यासगळ्या प्रकरणामुळे आमचा आर्थिक आणि मानसिक छळ झाल्याचे निर्माते तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील म्हणाले.

‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदार, DOP-आकाश काकडे, निर्माते तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार मिळविणारा आणि सफाई कामगाराच्या जीवनावर बेतलेला ‘मोऱ्या’ आता येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविणाऱ्या मोऱ्या चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading