आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे मोदींना भेटले, युतीत येण्याचे प्रयत्न असल्याचा केसरकरांचा दावा
मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची बातमी आहे. त्यांचा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले मात्र ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याचा स्पष्ट इन्कार करताना लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला.
गेल्या आठवड्यापासून राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीला जाऊन भेट घेतल्याची कुजबूज सुरू होती. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी आज या वृत्ताचा हवाला देत, उद्धव ठाकरे भाजपसोबत येण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला. केसरकर यांनी हे वक्तव्य एकत्र येण्यात खोडा घालण्यासाठी केले आहे की महाविकास आघाडीत संशयाचे पिल्लू सोडण्याचा प्रयत्न आहे हे त्यांनाच ठाऊक; पण या कुजबुजीला त्यांनी हवा दिली आहे. गेल्या आठवड्यापासून ही चर्चा सुरू असली तरी उद्धव ठाकरे गटाकडून कोणीही याचा इन्कार केलेला नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही अशाच शंकेमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे निवडणूक झाल्यानंतर भाजपसोबत जाणार नाही याची हमी मागितली असल्याकडे केसरकरांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा शब्द फिरवून पंतप्रधान मोदींना फसवले. आता त्यांना जवळ घ्यावे की नाही, हा भाजपचा प्रश्न आहे मात्र शिवसैनिकांनी सावध व्हावे, असेही केसरकर म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसरकर यांच्या दाव्याचे तात्काळ याचे खंडन केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
