तर राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू – शरद पवार
बारामती : राज्य सरकारने बारामतीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित आहेत. शरद पवार यांनी यावेळी राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही जर तरुणांच्या हाताला काम दिले, तर आम्ही तुमच्यासोबत राहू. ही खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार यांनी सांगितले. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार बोलत होते.
रोजगारासाठी सरकार पावलं टाकतंय ही चांगली गोष्ट आहे. राजकारण एका बाजूला असतं. मुलांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू. एवढी खात्री मी तुम्हाला देतो, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या विविध संस्थांची माहिती दिली. तसेच विद्या प्रतिष्ठानमधून कोणते शिक्षण दिले जाते? किती विद्यार्थ्यांना रोजगार मिळतो? कोणत्या कोणत्या कंपन्या या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात याची माहितीही शरद पवार यांनी दिली.
