Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

वर्तणूक पद्धतींचा अंतर्भाव डिझाईनमध्ये केल्यास अपेक्षित परिणाम साधणे शक्य  

जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध बिहेविअरल सायन्टिस्ट मॅट वॉलर्ट यांचे प्रतिपादन

१८ व्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलला सुरुवात

पुणे  : कोणत्याही नवीनतम कल्पनांनी जग आणखी सुंदर होते. जो बदल आपण डिझाईनच्या स्वरुपात पाहू इच्छित आहोत तो सत्यात उतरविण्यासाठी ‘बिहेविअर’ अर्थात वर्तवणूक पद्धती जाणून घेणे ही पहिली पायरी आहे. कोणताही डिझायनर हा डिझाईन प्रक्रीयेदरम्यान घडत असतो मात्र डिझाईन कशा प्रकारे काम करेल, त्याचा सकारात्मक परिणाम काय होईल, हे पहायचे असेल तर संकल्पनेपासूनच वर्तणूक पद्धतींचा अंतर्भाव डिझाईनमध्ये व्हायला हवा, असे मत जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध बिहेविअरल सायन्टिस्ट अर्थात वर्तवणूक शास्त्रज्ञ मॅट वॉलर्ट यांनी व्यक्त केले.

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) च्या वतीने आयोजित १८ व्या पुणे डिझाईन फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्रेडिक्टिंग व्हर्सेस डिझायनिंग डिस्रपशन्स’ या विषयावर मॅट वॉलर्ट बोलत होते.

नगर रस्त्यावरील रस्त्यावरील हयात रिजन्सी या ठिकाणी सदर महोत्सव सुरु असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईन या विषयात होत असलेले काम, डिझाईनचे आयाम, नजीकचे भविष्य, या क्षेत्रातील अनेकविध विषयांवर चर्चा, कार्यशाळा यांचा लाभ उपस्थितांना घेता येणार आहे. ‘व्हर्सेस’ अर्थात डिझाईन क्षेत्रातील बहुआयामी विरोधाभास अशी या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे.

नचिकेत ठाकूर यांसोबत एमआयटी एडीटी – लोणी काळभोर येथील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने महोत्सवाला सुरुवात झाली. यानंतर बोलताना मॅट वॉलर्ट म्हणाले की, “डिझायनर म्हणून आपला कम्फर्ट झोन डिझायनर्सने सोडायला हवा. यासोबतच वर्तणूक पद्धती आणि वर्तनशास्त्र याचा समग्र विचारही डिझाईन तयार करताना करायला हवा.”

यानंतर आरोग्य क्षेत्रात डिझाईन विषयक धोरणात्मक अनुभव असलेले सल्लागार सचिन बेहेरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जगभरात आरोग्य क्षेत्रात डिझाईनचा फारसा वापर होत नसल्याचा विरोधाभास मी पाहिला आहे असे सांगत बेहेरे म्हणाले, “आयसीयु सारख्या ठिकाणी खरेतर रुग्णांची गरज लक्षात घेत डिझाईन करायला हवे हा विचार आता चर्चिला जाऊ लागला आहे. योग्य पद्धतीने डिझाईन केल्यास त्याचा फायदा मानवी कार्यक्षमता वाढविण्यास होऊ शकतो. नवीनतम कल्पनांना यामध्ये वाव असला तरी हे होत असताना सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जायला हवे.”

डिझाईन उद्योजिका कादंबरी मिस्रा यांनी यानंतर आपल्या आयकॉनिक वूमेन या पॉडकास्ट उपक्रमाबद्दल माहिती दिली. पुण्यातील ‘रिचरखा’ या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या संस्थापिका अमिता देशपांडे यांनी यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि ग्राहकप्रिय डिझाईन्सचा अंतर्भाव करीत सुरु केलेला हा उपक्रम कशा पद्धतीने आकार घेत आहे याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आज मानवी हस्तक्षेपाने उभे राहिलेल्या पर्यावरणीय समस्यांना तोंड देताना कचरा व्यवस्थापनावर आम्ही भर दिला. आमची उत्पादने बनवताना ती ग्राहकप्रिय करण्याच्या दृष्टीने डिझाईनच्या वापरावर आम्ही लक्ष केंद्रित केले. हातमाग ही आपली परंपरा असून त्याद्वारेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार देत स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उत्पादने तयार करताना योग्य वेळी त्यामध्ये डिझाईनचा अंतर्भाव करीत आम्ही आमची उत्पादने ग्राहकांसमोर ठेवली. आज ग्राहकांना ती आवडत आहेत याचा आनंद आहे.” पुनर्वापरासोबतच कचरा व्यवस्थापन हा विषय आज गंभीर्याने घेण्याची गरज असल्याकडे अमिता देशपांडे यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading