उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार वलयांकित तरीही जबाबदारी वाढविणारा
– युवा सरोद वादक सारंग कुलकर्णी यांचे प्रतिपादन
पुणे : उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने मिळालेला उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार हा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. सरोदवादनासाठी संपूर्ण देशातून या पुरस्कारासाठी माझी निवड झाली आहे ही वलयांकित बाब असली तरी उस्तादजींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा असल्याच्या भावना पुण्यातील युवा, आश्वासक सरोदवादक सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
सारंग कुलकर्णी यांना नुकताच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संगीत नाटक अकादमीच्या वतीने संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक कला आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आश्वासक युवा कलाकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. नुकताच २०२२- २०२३ साठीचे हे सन्मान जाहीर झाले. संगीत क्षेत्रात शास्त्रीय वादन या विभागात सारंग यांना उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले.
लवकरच दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ताम्रपत्र आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २००६ सालापासून संगीत नाटक अकादमीच्या वतीने उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार प्रदान करणात येतात. देशांतील अनेक दिग्गज कलाकारांना या आधी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे हे विशेष.
या वेळी पुढे बोलताना सारंग कुलकर्णी म्हणाले, “जेव्हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आई- बाबांनी मला फोनवर दिली तेव्हा खरेतर माझा त्यावर विश्वासच बसला नाही. उस्ताद बिस्मिल्ला खॉं या इतक्या मोठ्या कलाकाराच्या नावाने होत असलेला माझा हा सन्मान स्वप्नवत आहे. माझे वडील आणि गुरु पं राजन कुलकर्णी यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. हा पुरस्कार मला नवी उर्जा देणारा, नवी वाट दाखविणारा आणि नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे.”
खरेतर सरोद हे वाद्य थोडेसे कठीण वाद्य आहे. त्याला पडदे नसल्याने या वाद्याला ‘ब्लाईंड इन्स्ट्रूमेंट’ देखील म्हटले जाते. आज या पुरस्काररूपी सन्मानाने सरोद हे वाद्य जास्तीत जास्त रसिकांबरोबरच युवा पिढीपर्यंत पोहोचण्यास नक्की मदत होईल. युवा वादकांनीही हे वाद्य शिकण्यावर भर द्यावा असे, सारंग कुलकर्णी म्हणाले.
