कॅमेर्याच्या माध्यमातून नवरसांचा समृद्ध परिपोष टिपण्याची जादू
पुणे : छायाचित्रकार नीलेश काळे यांनी कॅमेर्याच्या माध्यमातून नवरसांचा समृद्ध परिपोष टिपण्याची जादू केली आहे. वेरुळचे, कैलास मंदिराचे अद्भुत रूप त्यांनी कलात्मक दृष्टीने पाहिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डाॅ. गो. बं. देगलूरकर यांनी मंगळवारी येथे काढले.
निमित्त होते, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून सर्वपरिचित असलेल्या वेरूळच्या कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर अनेक अंगांनी प्रकाश टाकणार्या छायाचित्र प्रदर्शनाचे. ललित कला अकादमी पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार नीलेश काळे यांनी पॅनोरामा प्रकारात काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन २८ एप्रिलपासून ३ मे पर्यंत घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात ‘एलोरामा’ शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायं. ७ दरम्यान या प्रदर्शनाचा अनुभव पुणेकरांना घेता येणार आहे. सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
एलोरामा या प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे मूर्तीशास्त्रज्ञ आणि कैलास मंदिरावरील तज्ज्ञ असलेले डॉ. गो. बं. देगलूरकर, खासदार प्रो. मेधा कुलकर्णी आणि प्रसिद्ध कलाकार जयंत जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
डाॅ. देगलूरकर म्हणाले, मी १९५१ पासून असंख्य वेळा वेरूळ अनुभवत आलो आहे. मात्र, पॅनोरमा व्ह्यूमधून मी प्रथमच वेरूळचे दर्शन घेतले. वेरूळची आणि कैलास मंदिराची निर्मिती पूर्ण झाल्यावर निर्माणकर्त्या शिल्पींनाही आश्चर्य वाटले होते, की हे आपल्या हातून खरेच घडले आहे का. या प्रदर्शनातील कलात्मक छायाचित्रे पाहताना माझ्याही मनात हीच भावना दाटून आली. अखंड पाषाणातून वरून खालच्या दिशेने कोरून निर्माण केलेले हे अद्वितीय शिल्पसौंदर्य म्हणजे नवरसांचा, भावभावनांचा परिपोष आहे. सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलांचे चित्रण पराकोटीच्या अचूकतेने आणि अजोड पद्धतीने इथे केले आहे. नीलेश यांची छायाचित्रेही अशीच अजोड आहेत.
जयंत जोशी म्हणाले, संस्कृतीतील सृजनाचे संदर्भ जपण्यासाठी छायाचित्रकार नीलेश यांनी केलेले हे प्रयत्न अतिशय महत्वाचे आहेत. परमेश्वराच्या नावाशी संलग्न असलेल्या ज्या उदात्त संकल्पना आहेत, त्यांचे प्रतिरूप शिल्पांमधून वेरूळ येथे निर्मिले गेले आहे. कालौघात यातील काहींचा क्षय होणार आहे. या शिल्पसृष्टीचे मूळ स्वरूप शोधण्याच्या ध्यासातून नीलेश यांनी अचूक पॅनोरामिक प्रतिमा आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी या शिल्पांचे थ्री डायमेन्शनल मॅपिंग केले आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, नीलेश हे ध्येयसमर्पित आणि उत्कट वृत्तीचे छायाचित्रकार आहेत. कॅमेर्याच्या माध्यमातून त्यांनी जणु परकायाप्रवेश करत अप्रतिम छायाचित्रांची ही जादू घडवली आहे. वेरूळ आणि इतरही अनेक वास्तू, मंदिरे हा आपला अभिमानास्पद वारसा आहे. मोलाचा ठेवा आहे. तो जतन करणे व संवर्धित करणे तसेच त्यांचे विपणन करणे, महत्त्वाचे आहे. आपल्या देशातल्या अशा ठेव्यावर प्रेम करणे, त्यांचा अभिमान बाळगणे, त्यांचे जतन करणे यातून आपण आपल्या मातीशी, संस्कृतीशी जोडले जातो. जगातले आश्चर्य म्हणून वेरूळची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या.
शोभना काळे यांनी स्वागत केले. रवी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सोनल काळे यांनी आभार मानले.
